खानापूरच्या तऊणावर कारवाई : लष्करी गणवेशाचा वापर करत अनेकांची फसवणूक
पुणे : भारतीय लष्करातील सुभेदारपदाचा युनिफॉर्म घालून नागरिकांची दिशाभूल करत फसवणूक करणाऱ्या एका तोतयाला गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. प्रशांत भाऊराव पाटील (वय 32, सध्या रा. म्हेत्रे निवास दुर्गानगर, सोनवणे वस्ती, चिखली, पुणे, मूळ रा. कुप्पटगिरी, ता. खानापूर, बेळगाव) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून पोलिसांनी 63 हजार ऊपये किमतीचा एक आयफोन, 14 कंपनींचे मोबाईल फोन, एक वन प्लस 9 प्रो कंपनीचा मोबाईल, सैन्य दलाचे दोन युनिफॉर्म, इतर साहित्य, तीन आधारकार्ड, पॅन कार्ड, ओळखपत्र तसेच चार कलर फोटो असा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत खंडणीविरोधी पथक दोनचे पोलीस अंमलदार अमोल परशुराम पिलाणे यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात फिर्याद दिली आहे. हा प्रकार सोमवारी सदर्न कमांड हेडक्वॉटर कार्यालय, क्वीन्स गार्डन, पुणे येथे उघडकीस आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत पाटील हा सिक्मयुरिटी गार्ड म्हणून काम करत असून तो मूळ कुप्पटगिरी ता. खानापूर, बेळगाव येथील रहिवासी आहे. सन 2019 पासून ते आजपर्यंत भारतीय सैन्य दलामध्ये असल्याचे भासवून त्याने खडकी पुणे येथील दुकानदार रिटायर्ड सुभेदार मेजर सुरेश मोरे यांच्याकडून सैन्य दलाच्या सुभेदारपदाचे दोन युनिफॉर्म व इतर बाबी असे साडेचार हजार ऊपयांचे साहित्य घेतले. पैसे नंतर देतो, असे सांगितले. मात्र, आतापर्यंत पैसे न देता त्यांची आर्थिक फसवणूक केली असल्याचे निष्पन्न झाले. यासंबंधीच्या तक्रारीनंतर त्याला जेरबंद करण्यात आले आहे.
सदर्न कमांडमध्ये कार्यरत असल्याचा बनाव
प्रशांत पाटील याने फसवणूक करत असताना आपण सदर्न कमांडमध्ये कार्यरत असल्याचा दावा केला. सैन्य दलाचा युनिफॉर्म परिधान करून व सैन्य दलाचा युनिफॉर्म असलेले फोटो, बनावट आयडी वापरून सदर्न कमांड हेडक्वॉटर क्वीन्स गार्डन, पुणे या सैन्यदलाच्या प्रमुख कार्यालयाच्या परिसरात तो अधिकारी असल्याचे भासवित होता. तसेच सदर्न कमांड, पुणे या कार्यालयाच्या पत्त्याचा त्याने वापर केला. बनावट आधारकार्ड काढून तसेच पॅनकार्ड व ओळखपत्रावर भारतीय सैन्यदलाचे युनिफॉर्म परिधान केलेल्या फोटोचा वापर करून फसवणूक केल्याप्रकरणी आरोपीवर भादंसं कलम 170, 171, 420, 465 468, 471 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रशांत पाटीलचे कारनामे : खानापूरमध्ये यापूर्वी कोट्यावधींचा गंडा
खानापूर : तालुक्यातील कुप्पटगिरी गावचा तरुण प्रशांत भाऊराव पाटील यांने बेळगाव जिल्ह्यातील अनेक युवकांना आपण भारतीय सैन्यातील वरिष्ठ पदावर नोकरी करत असल्याचे सांगत गेल्या पाचवर्षापूर्वी कोट्यावधी रुपयाला गंडा घातला आहे. तसेच त्यांना कर्नलच्या स्वाक्षऱ्या असलेल्या सैन्यात भरती झाल्याचे पत्रही देण्यात आले होते. याबाबत तरुणांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर त्याला अटकही करण्यात आली होती. तसेच अहमदनगर, नाशीकसह इतर ठिकाणीही त्याच्या विरोधात गुन्हे दाखल होते. यापूर्वी अहमदनगर पोलिसांनी त्याला कुप्पटगिरी येथून त्याच्या राहत्या घरातून अटक केली होती. अनेक वेळेला अशा स्वरुपाच्या गुन्ह्यात त्याला अटक झाली होती. मात्र वेळोवेळी तो यातून बाहेर येऊन पुन्हा गुन्हे करत आहे. त्याच्याकडे सैन्यातील वरिष्ठ पदावर नोकरी करत असलेले ओळखपत्र आहे. तालुक्यातील युवकांनाही त्यांनी आर्थिक गंडा घातलेला आहे. कुप्पटगिरी येथे अलिशान घरदेखील बांधलेले आहे. अहमदनगर येथील गुन्ह्याच्या संदर्भात पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर आपल्या वृद्ध आई, वडिलानादेखील त्यांने येथून पुणे येथे नेले आहे. बोलण्यात, सराईत असल्याने अनेकांना त्यांने आर्थिक गंडा घातलेला आहे. महिलांच्या फसवणुकीचेही गुन्हे त्याच्यावर नेंद आहेत. वेळोवेळी गुन्हे करुनदेखील तो सहीसलामत बाहेर पडत आहे. त्यामुळे या फसवणुकीच्या रॅकेटमध्ये कोणी वरिष्ठ अधिकारी सामील आहेत का, अशीही चर्चा खानापुरात होत आहे. 2010 यावर्षात तो असाम, रायफलमध्ये सैनिक म्हणून भरती झाला होता. मात्र प्रशिक्षण पूर्ण करण्याअगोदरच तो तेथून पळून आला होता. यानंतर त्यांने आपल्या या कारनाम्यास सुरवात केली होती. पुन्हा फसवणुकीच्या गुन्ह्यात त्याला पुणे येथे अटक करण्यात आली आहे.









