विजापूर पोलिसांची कारवाई, सदलग्याचा रहिवासी असल्याचे निष्पन्न
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील तोतया लोकायुक्त अधिकाऱ्याला विजापूर पोलिसांनी अटक केली आहे. लोकायुक्त पोलीस उपअधीक्षक असल्याचे सांगत सरकारी अधिकाऱ्याकडून 70 हजार रुपयांची त्याने मागणी केली होती. त्यामुळे त्याला अटक झाली आहे. मुरग्याप्पा निंगाप्पा कुंभार (वय 57) रा. सदलगा, ता. चिकोडी असे त्याचे नाव आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळजवळ दि. 27 जानेवारी रोजी मुरग्याप्पाला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर राज्यातील वेगवेगळ्या पोलीस स्थानकांमध्ये 57 हून अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. बेळगावातही त्याने अनेक अधिकाऱ्यांना ठकवले आहे. मुरग्याप्पा हा बडतर्फ पोलीस हवालदार असून लोकायुक्त अधिकारी असल्याचे सांगून सरकारी अधिकाऱ्यांकडून खंडणी वसूल करतो.
मुद्देबिहाळ येथील के. बी. जे. एन. एल. उपविभागाचे साहाय्यक कार्यकारी अधिकारी अशोक तिप्पण्णा बिरादार (वय 43) यांच्याकडे त्याने 70 हजार रुपयांची मागणी केली होती. आपण लोकायुक्त अधिकारी आहोत, तुमच्यावर कारवाई व्हायची नसेल तर आपल्याला पैसे द्या, असे सांगत त्याने पैशांची मागणी केली होती. विजापूरचे जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी मुरग्याप्पाला अटक केली आहे. मुरग्याप्पाने यापूर्वी बेळगाव जिल्ह्यातील अनेक अधिकाऱ्यांना लोकायुक्त कारवाई करण्याची धमकी देऊन त्यांच्याजवळून पैसे उकळले होते. एखाद्या प्रकरणात अटक झाल्यानंतर जामिनावर बाहेर पडून तो पुन्हा त्याच कामास लागतो, असा आजवरचा अनुभव आहे. अनेक प्रकरणात न्यायालयाने मुरग्याप्पाविरुद्ध वॉरंट आणि प्रोक्लेमेशनचा आदेश जारी केला होता.









