प्रतिनिधी,रायगड
महाराष्ट्र राज्याचे स्वच्छता दूत त्याच बरोबर महाराष्ट्र भूषण डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाने एक पत्र समाज माध्यमांवर प्रसारित करण्यात आले आहे. मात्र हे पत्र बनावट असल्याचे नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले.असे कुठलेही पत्र आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यावतीने जारी करण्यात आले नसल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
काय म्हटलयं पत्रात
महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण समारंभामध्ये श्री सदस्यांचा उष्माघाताने झालेल्या मृत्यूमुळे राजकारण तापले असतानाच, शनिवारी आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाने एक पत्र समाज माध्यमांवर प्रसारित झाले. ज्यात राज्य सरकारच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले गेले होते. शासनाने दिलेला पुरस्कार परत करणार असल्याचेही नमूद करण्यात आले होते. माझ्या अनुयायांचा मतांसाठी वापर केला. माझ्या साधकांसाठी मंडप टाकला नाही. झालेल्या घटनेची पूर्ण जबाबदारी घेऊन मी श्री सेवकांची माफी मागतो. माझ्या सर्व श्री सेवकांना मी आवाहन करतो की यापुढे भाजप आणि शिंदे गटाला मतदान करू नका, असे बनावट पत्रात नमूद करण्यात आले होते.
समाजमाध्यमांवर हे पत्र वेगाने प्रसारित होण्यास सुरुवात झाल्यामुळे खळबळ उडाली होती.याबाबत नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे प्रवक्ते तथा आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे सचिव संदीप गजानन पाटील (५३) रा.साळाव,तालुका मुरुड जिल्हा रायगड.यांनी रेवदंडा पोलीस ठाण्यामध्ये वरील प्रकरणी रितसर तक्रार दिली आहे. सदरचे पत्र बनावट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.कोणीतरी खोडसाळपणा करून यापूर्वी आप्पासाहेबांनी काढलेल्या पत्राचा वापर करण्यात आलेला आणि त्यातील मूळ मजकूर काढून त्यात, फेरफार करण्यात येऊन हे पत्र तयार केले असल्याचे नमूद केले आहे. या प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली आहे.
Previous Articleअश्लील रॅप साँग शूट प्रकरणी अभाविप आक्रमक; विद्यापीठात राडा
Next Article मागणी साडेपाच हजार कोटींची, मिळाले दहा कोटी








