कोल्हापूर :
शहरातील लक्ष्मीपुरी येथील प्लॉस्टिक विक्रेत्याच्या दुकानात बोगस पत्रकारांनी छापा टाकून, दुकान चालकाकडून तीन लाख रुपयांची खंडणी उकळली होती. या टोळीचा मुख्य सुत्रधार अन्सार रफिक मुल्ला (वय 43, रा. मातंग वसाहत, बोंद्रेनगर, फुलेवाडी रिंगरोड, कोल्हापूर) या बोगस पत्रकाराला सोमवारी रात्री लक्ष्मीपूरी पोलिसांनी अटक केली. तो गेल्या अडीच महिन्यापासून पसार होता. या प्रकरणातील संशयीत स्थानिक वृत्तवाहिनीचा कॅमेरामन सागर चौगलेसह आणखीन काही जण पसार आहेत. त्याचा पोलिसांनी शोध सुऊ केला आहे, अशी माहिती लक्ष्मीपूरी पोलिसांनी दिली.
7 ऑक्टोंबर,2024 रोजी अन्सार मुल्ला व त्याच्या टोळीने लक्ष्मीपुरी येथील सनी दर्डा यांच्या प्लॉस्टिक द्रोण, पत्रावळ्याच्या दुकानात छापा टाकून, बातमी प्रसिध्द करण्याची धमकी देवून, पाच लाखांची खंडणी मागितली. दर्डा यांनी घाबरून तीन लाख रुपये दिले. तोतया पत्रकार अन्सार मुल्ला याने हे पैसे त्याच दिवशी आपल्या सर्व सहकाऱ्यामध्ये वाटून घेतले. हा खंडणीच्या गुन्हा तोतया पत्रकारांच्या 16 संशयितांविरोधी नोंद झाला आहे. दुकानातील सीसीटीव्ही फुटेजपाहून पोलीसांनी यातील अनेकांना आतापर्यंत अटक केली आहे. पण तोतया पत्रकार अन्सार मुल्ला, वृत्तवाहिनीचा कॅमेरामन सागर चौगले आणि काही संशयीत अद्यापी पसार आहेत. मुल्ला याने अटकपूर्व जामिन मिळावा. याकरीता त्याने जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनअर्ज दाखल केला होता. पण त्याचा अटकपूर्व जामिनअर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावला. त्यामुळे त्याने मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात धाव घेवून अटकपूर्व जामिन मिळविण्यासाठी अटोकाट प्रयत्न केला. पण मुंबई उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात त्याचा अटकपूर्व जामिनअर्ज फेटाळून लावला. त्यामुळे त्याने सोमवारी रात्री लक्ष्मीपूरी पोलिसात शरण येत स्वत:हून हजर झाला. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. मंगळवारी त्याला जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.








