खानापूर पोलिसांत गुन्हा दाखल
खानापूर : तालुक्यातील लोकोळी येथील मंथन दशरथ पाटील (वय 22) याने काही मुलींच्या नावे खोटे इन्स्टाग्राम अकाऊंट काढून त्याद्वारे काही अश्लील फोटो अपलोड करून प्रसारित केले आहेत. त्यामुळे मैत्रिणींमध्ये खळबळ माजली आहे. भीतीदायक वातावरण तयार झाल्यानंतर आपल्या पालकांशी चर्चा केल्यानंतर खानापूर पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. खानापूर पोलिसांनी तक्रार दाखल करून मंथन पाटील याच्यावर सायबर क्राईमद्वारे गुन्हा दाखल केला असून खानापूर पोलीस पुढील तपास करीत आहेत. मंथन याने काही मुलींच्या नावे खोटे इन्स्टाग्राम अकाऊंट काढून अश्लील फोटोवर आपल्या मैत्रिंणीचे फोटो एडीट करून अपलोड केले आणि इन्स्टाग्रामवरील मैत्रिणींना पाठविले. याबाबत सर्व मैत्रिणी एका भीतीदायक वातावरणात वावरत होत्या. मंथन हा त्यांना धमकावून गप्प बसवत होता. मात्र काही मैत्रिणींनी ही बाब आपल्या पालकांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर सर्व मैत्रिणी एकत्र येऊन चर्चा केल्यानंतर पालकांनी खानापूर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. अश्लील फोटो अपलोड करून मैत्रिणींची बेअब्रू करण्याच्या हेतूने त्याने अनेकांना संदेशही पाठविल्याचे समजते. मंथनच्या या विकृतीमुळे मुलीकडून संताप व्यक्त होत आहे. ज्यांचा काही संबंध नसताना एकमेकीच्या अकाऊंटवरून फोटो अपलोड करून धमकी देण्याचे प्रकार सुरू होते. गेल्या पंधरा दिवसांपासून हा प्रकार सुरू होता. याबाबत मुलीमधून वाच्यता होत नव्हती. मात्र मंथनने वारंवार अश्लील फोटो एडिट करून अपलोड केल्यानंतर काही मुलींनी ही बाब आपल्या पालकांच्या निदर्शनास आणल्याने ही घटना उघडकीस आली आहे.









