सहा जणांना अटक, दोन दिवसांत तीन ठिकाणी कारवाई
सातारा प्रतिनिधी
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बनावट गुटखा तयार करुन विक्री करणाऱ्यांचे रॅकेट उघडकीस आणले आहे. दोन दिवसात तीन ठिकाणी कारवाई करुन 6 जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन इनोव्हा, एक रिक्षा आणि बनावट गुटखा हस्तगत केला आहे. याची किंमत 32 लाख रुपये इतकी आहे.
या कारवाईमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून जिह्यात बनावट गुटखा विक्री करणाऱ्यांचे नेमके धागेदोरे आणखी कुठे आहेत याचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान, अटक करण्यात आलेल्यांमध्ये दीपक राजगौंडा पाटील (वय 36, रा. शिरदवाड, जि. बेळगाव), ललित सुमेरमल काछिया (वय 56, रा. सुरुर, ता. वाई), तेजस अवघडे (वय 22),. आदित्य हरिश्चंद्र अवघडे (वय 22रा. दुर्गापेठ), अनुष चिंतामणी पाटील (वय 19, रा. गुरुवार पेठ), वैभव रवींद्र पावस्कर (वय 35, रा. शुक्रवार पेठ) या सहा जणांचा समावेश आहे.
याबाबत माहीती अशी कि, स्थानिक गुन्हे शाखेला माहिती मिळाली की, एका इनोव्हा कारमधुन बंदी असलेला गुटखा बावधन नाका वाई येथे येणार आहे. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदार हे बावधन नाका वाई येथे सापळा लावून कार ताब्यात घेतली असता त्यामध्ये 5 लाख 75 हजार 840 रुपयांचा गुटखा आढळून आला. त्या चालकाकडून इनोव्हा कारसह एकुण 15 लाख 75 हजार 840 रुपयाचा ऐवज हस्तगत करण्यात आला.
त्यानंतर सुरुर (ता. वाई) येथे इनोव्हा कार क्र. (एम. एच. 01 ए एम 4537) यामधुनही गुटखा येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. सुरुर फाटा (ता. वाई) येथे स्थानिक गुन्हे शाखेने सापळा लावून इनोव्हा कार ताब्यात घेतली. त्यामध्ये 4 लाख 75 हजार 972 रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला. इनोव्हा कार व गुटखा असा एकूण 14 लाख 75 हजार 972 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.
त्यानंतर चारभिंती सातारा येथे रिक्षा क्रमांक एम.एच.11 सी.जे. 2505 मधून 3 जण बनावट आर. एम. डी. गुटखा घेवुन येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्याठिकाणीही स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लावुन दि. 5 रोजी दुपारी 12.50 वाजण्याच्या सुमारास ऑटो रिक्षा त्यामधील 3 जण ताब्यात घेतले. त्यांच्यांकडून 1 लाख 87 हजार 200 रुपये किंमतीचा बनावट गुटखा हस्तगत केला.
तसेच ऑटोरिक्षामधील त्या तिघांकडे चौकशी करून तृप्ती चायनीज सेंटरवर छापा टाकला. त्या ठिकाणी 2 लाख रुपये किंमतीची ब्लेंडीग आणि पॅकिंग मशीन मिळुन आली. तीही जप्त करण्यात आली असुन बनावट गुटखा बनवणारा वैभव पावसकर यास देखील ताब्यात घेतले आहे. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेने एकूण 36 लाख 39 हजार 12 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत अनुक्रमे वाई पोलीस ठाणे, भुईंज पोलीस ठाणे तसेच सातारा शहर पोलीस ठाणे येथे संबंधीतांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.









