पोलिसांनी छापा मारून केली कारवाई : गुजरातमधील पाच जणांना अटक
प्रतिनिधी / पर्वरी
मायक्रोसॉफ्ट कंपनीचे कर्मचारी असल्याचे सांगून कर्ज मंजुरीच्या नावाखाली विदेशी नागरिकांची फसवणूक करणाऱया गोवेकर नगर पिळर्ण येथील एका घरावर छापा मारून बनावट कॉल सेंटरचा पर्वरी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.
या प्रकरणी पर्वरी पोलिसानी गुजरातमधील पाच जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून तीन लेपटॉप, दोन संगणक आणि अंदाजे चार लाखांचा ऐवज जप्त केले आहेत. संशयित पठाण जाहूरखान (28,अहमदाबाद गुजरात),कुणाल गुप्ता (27, गुजरात), कुरमी अनिल सिंग (24, गुजरात), सरोज जयदीप (23, गांधीनगर, गुजरात), अयाज खान (23,गुजरात) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
यासंबंधीचे सविस्तर वृत्त असे की, वरील सर्व संशयित विदेशी नागरिकांना कॉल करून त्यांना एक लिंक पाठवून त्यांचा मोबाईल बंद करत असत. ज्यावेळी तो विदेशी नागरिक परत कॉल करायचा त्यावेळी संबंधित संशयितांना कॉल जात असे. त्यावेळी ते तुमचा मोबाईल हॅक झाला आहे, त्याला व्हायरसची समस्या आहे. असे सांगून आम्ही तो दुरुस्त करून देतो, असे सांगून पाच दहा मिनिटांत दुरुस्त करून देत असत. तसेच कर्ज मंजुरी करून देण्याचे आमिष दाखवून त्याबदल्यात त्यांच्याकडून पाचशे ते हजार डॉलर उकळण्याचे प्रकार सुरू होते, अशी माहित पोलिसांनी दिली. तपोलिस निरीक्षक अनंत गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रतीक भट यांनी भा. द. क्र. 419, 420 कलमा खाली गुन्हा दाखल करून संशयितांना अटक केली आहे. पुढील तपास करीत आहे.









