फसवणुकीचा आकडा कोट्यावधींच्या घरात असण्याची शक्यता : समाजसेवक जयंत तिनईकर यांचा आरोप
बेळगाव : मंत्र्यांच्या कार्यालयासह विविध खात्यांमध्ये सरकारी नोकरी मिळवून देण्याचे सांगत दोघांनी अनेकांना बनावट नियुक्तीपत्र देऊन आर्थिक फसवणूक केली आहे. याबाबत पोलिसात तक्रार दाखल करण्यास गेले असता, पोलिसांकडून गुन्हा दाखल करून घेण्यास चालढकल केली जात आहे. या सर्व प्रकरणामागे मोठ्या शक्तीचा हात असून मुख्यमंत्र्यांसह विविध खात्याकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे याची पोलिसांनी सखोल चौकशी करावी, अशी मागणी समाजसेवक जयंत तिनईकर यांनी पत्रकार परिषदेत केली. ते म्हणाले, बनावट नियुक्ती पत्र देऊन फसवणूक करण्यात मंजुनाथ मलसर्ज आणि संगनगौडा पाटील यांचा प्रमुख सहभाग आहे. सुरुवातीला मंजुनाथ याने खानापूर तालुक्यातील गंदिगवाड येथील काव्या येळ्ळूर हिला गाठले. महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या कार्यालयात कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून तुला सरकारी नोकरी लावतो. मात्र या मोबदल्यात साडेचार लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले.
त्यावेळी काव्याने सुरुवातीला त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. त्यामुळे मंजुनाथने संगनगौडा पाटील याचे मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यासोबत असलेले काही फोटो तिला दाखविले. त्यामुळे तिने त्यांच्यावर विश्वास ठेवून साडेचार लाख रुपये दिले. इतकेच नव्हे तर तिच्या भावालाही सरकारी नोकरी देतो असे सांगून आणखी एक लाख रुपये घेतले. एकूण साडेपाच लाख रुपयांची रक्कम घेतल्यानंतर कर्नाटक सरकारचा लोगो, मंत्री हेब्बाळकर यांच्या स्वाक्षरीनिशी बनावट आदेशपत्र तिला देण्यात आले. एप्रिल 2024 मध्ये आदेश देण्यात आला. नियुक्ती पत्र मिळाल्याने नियुक्तीच्या ठिकाणी जाऊन विचारपूस केली असता. सदर नियुक्ती पत्र बनावट असल्याचे समोर आले. त्यामुळे काव्या येळ्ळूर हिने मंजुनाथशी संपर्क साधला पण त्याने फारसा प्रतिसाद दिला नाही.
केवळ काव्या येळ्ळूर हिला नव्हे तर 16 जणांना अशा प्रकारे बनावट नियुक्ती पत्र देऊन त्यांची फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले आहे. नियुक्ती पत्रांवर राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्याही स्वाक्षऱ्या आहेत. सध्या 16 जणांना फसविल्याचे समोर आले असले तरी अंदाजे 250 ते 300 जणांची फसवणूक झाल्याचा अंदाज आहे. रक्कम परत करण्यासाठी तगादा लावल्याने काहीजणांना 75 टक्के रक्कम परत करण्यात आली आहे. तर 25 टक्के रक्कम मिळालेली नाही. पोलिसांनी मात्र 25 टक्के रक्कम संबंधितांना मिळाली असल्याचे एका करारात म्हटले आहे पण 25 टक्के रक्कम पोलिसांनी हडप केल्याचा आरोपही तिनईकर यांनी केला.
प्रकरणाचा तपास सुरू : एसपी
बनावट नियुक्ती पत्र देऊन काही जणांची फसवणूक केल्याचे समजल्यानंतर महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी 5 एप्रिल 2025 रोजी आपल्याशी पत्रव्यवहार करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली होती. यापूर्वीच कित्तूर पोलीस स्थानकात संबंधिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. संशयिताला न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने त्याला अटक होऊ शकली नाही. पण या प्रकरणाची चौकशी सुरू असून यापूर्वीच काव्या येळ्ळूर हिला नोटीसही देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.









