ऑनलाईन टीम / तरुण भारत :
दहावी नापास असलेल्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण असल्याचे बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या टोळीचा पुणे पोलिसांनी पदार्फाश केला. या प्रकरणात आतापर्यंत चौघांना अटक करण्यात आली असून, या टोळीने 2700 जणांना बनावट प्रमाणपत्र दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. टीईटीनंतरचा राज्यातील हा सर्वात मोठा घोटाळा असल्याचे सांगितले जाते.
संदीप ज्ञानदेव कांबळे (वय 35, रा. सांगली), कृष्णा सोनाजी गिरी (34, रा. बिडकीन, जि. धाराशिव), अल्ताफ महंमद शेख (38, रा. परांडा, जि. धाराशिव), सय्यद इम्रान सय्यद इब्राहिम (38, रा. संभाजीनगर) अशी याप्रकरणात आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी ठोठावली आहे. या टोळीमध्ये अन्य काही आरोपी देखील सहभागी असल्याचा पोलिसांना संशय आहे.
दहावी, बारावीत नापास झालेल्यांना बनावट प्रमाणपत्र दिले जात असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी बनावट ग्राहक तयार करुन संदीप कांबळे यांच्याशी संपर्क साधला. त्याने 60 हजार रुपयांमध्ये प्रमाणपत्र मिळेल, असे सांगितले. बनावट ग्राहकाने 39 हजार रुपये त्याला ऑनलाईन ट्रान्सफर केले. व उर्वरित 21 हजार रुपये घेण्यासाठी कांबळे स्वारगेट परिसरात आला असता पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्या चौकशीत कृष्णा गिरी, अल्ताफ शेख आणि सय्यद इम्रान यांची नावे उघड झाली.
या टोळीचे मूळ छत्रपती संभाजीनगरमध्ये असून, त्यांनी महाराष्ट्र स्टेट ओपन स्कूलसारखी बनावट बेवसाइट बनवली. या माध्यमातून ही प्रमाणपत्र देऊन मिळणाऱ्या पैशात छ. संभाजीनगर येथे जमीन घेऊन स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करायचा या टोळीचा प्लॅन होता, अशी माहिती समोर येत आहे.








