द्रोणाचार्य पुरस्कार विजेते दिनेश लाड यांचा विश्वास
संतोष सावंत, सावंतवाडी
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याच्या टीमच्या हाती विश्वचषक असेल. आताच्या विश्वचषकामध्ये रोहित शर्माची टीम अत्यंत प्रभावशील आणि दर्जेदार अष्टपैलू भरणा असलेली टीम आहे. फलंदाजी , गोलंदाजी अशा सर्वच आघाड्यांवर या विश्वचषकातील भारतीय टीम बलाढ्य ऑस्ट्रेलिया ,न्यूझीलंड, इंग्लंड आणि पाकिस्तान या सर्वच संघांना भारी पडेल. आताच्या वर्ल्डकप मध्ये भारत, न्यूझीलंड ,ऑस्ट्रेलिया ,इंग्लंड आणि पाकिस्तान असे पाच संघ प्रभावशील आणि दावेदार समजले जात आहेत. मात्र, त्यात सरस भारतच आहे. ज्या दिवशी रोहित शर्माच्या हाती विश्वचषक असेल तो दिवस सर्व जगासाठी आनंदाचा दिवस असेलच. पण ,मलाही सर्वात सुखद आणि अत्यंत महत्त्वाचा आनंददायी दिवस ठरेल. आणि हा दिवस यंदाच्या नोव्हेंबर मध्ये उजाडेल. द्रोणाचार्य पुरस्कार विजेते माझे गुरु रमाकांत आचरेकर यांचे दोन शिष्य क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी असे दोघे 1996 च्या विश्वचषकात खेळले होते. तसेच या वर्ल्डकप मध्ये माझे दोन शिष्य कर्णधार रोहित शर्मा आणि अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर असे दोघेजण खेळत आहेत . हा एक योगायोगच आहे. असे द्रोणाचार्य पुरस्कार विजेते कर्णधार रोहित शर्माचे क्रिकेटचे गुरु दिनेश लाड यांनी तरुण भारतला दिलेल्या खास मुलाखतीत स्पष्ट केले. 5 ऑक्टोंबर ते 19 नोव्हेंबर या कालावधीत म्हणजे तब्बल दीड महिने भारतात वर्ल्ड कपचा रणसंग्राम सुरू झाला आहे. याबाबत भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर यांचे गुरु आणि सन 2022 मध्ये द्रोणाचार्य पुरस्कार विजेते दिनेश लाड यांच्याशी खास बातचीत केली असता ते म्हणाले आपल्या देशात विश्वचषक स्पर्धा होत आहे. त्यामुळे आपला भारत देश आणि रोहित शर्माची टीम विश्वचषकाची पहिली दावेदार आहे. आणि निश्चितपणे येथे 19 नोव्हेंबरला रोहित शर्माच्या हाती विश्वचषक दिसेल. अशी कामगिरी निश्चितपणे रोहित शर्माची टीम करणार आहे असे ते म्हणाले. न्युझीलँड, ऑस्ट्रेलिया इंग्लंड, पाकिस्तान, हे चार संघ वर्ल्डकपचे दावेदार आहेतच . परंतु त्यापेक्षा सरस भारत आहे असे ते म्हणाले.









