हिंदू धर्मग्रंथांचे मुद्रण करणारे जगातील सर्वात मोठे मुद्रणालय आणि प्रकाशनगृह अशी ख्याती असणाऱ्या ‘गीता प्रेस’ या संस्थेला 2021 चा ‘गांधी शांतता पुरस्कार’ प्रदान करण्याचा निर्णय केंद्र सरकारने नुकताच घेतला आहे. हा या संस्थेचा आणि तिने देशाच्या सांस्कृतिक क्षेत्रात आजवर केलेल्या महान कार्याचा यथोचित गौरव आहे. या संस्थेने 4 मे 2022 या दिवशी आपली 100 वर्षे पूर्ण केली आहेत. याचे औचित्य साधून हा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. भगवद्गीता, रामायण, महाभारत आदी लोकप्रिय हिंदू धर्मग्रंथाचे मुद्रण आणि अत्यंत वाजवी दरामध्ये वितरण ही संस्था करते. आतापर्यंत संस्थेने भगवद्गीतेच्या 28 कोटीहून अधिक आणि रामायण तसेच गोस्वामी तुलसीदास रचित रामचरितमानस या ग्रंथाच्या 12 कोटींहून अधिक प्रतींचे मुद्रण आणि वितरण या संस्थेने केले आहे. भगवद्गीतेवरील 100 हून अधिक भाष्य ग्रंथ प्रकाशित केले आहेत. तसेच 3,500 हून अधिक प्राचीन हस्तलिखितांचे संरक्षण आणि जतन केलेले आहे. तसेच इतर हिंदू धर्मग्रंथांचेही मुद्रण संस्थेकडून केले जाते. भगवद्गीता हा हिंदूंचा एक धर्मग्रंथ आहे, ज्याची लोकप्रियता सर्वात अधिक आहे. गीतातत्वज्ञानाचा प्रसार आणि प्रचार करणाऱ्या अनेक लहान-मोठ्या संस्था भारतात आणि इतर देशांमध्येही आहेत. तथापि, गीता प्रेसने या क्षेत्रात केलेल्या कार्याची व्याप्ती प्रचंड आहे. या संस्थेची स्थापना सेठ जयदयाळ गोयंका, हनुमान प्रसाद पोद्दार आणि घन:श्यामदास जालान या तीन त्यावेळच्या ध्येयप्रेरित, गीताप्रसारक युवकांनी केली होती. जवळ फारसे धन नसताना आणि देश त्यावेळी पारतंत्र्यात असल्याने राजकीय वातावरण अनुकूल नसताना त्यांनी हे अभियान हाती घेतले होते. त्यावेळी रुजविलेल्या बीजाचा आज महाकाय वटवृक्ष झाला आहे. केवळ भगवद्गीताच आणि रामचरितमानसच नव्हे, तर संस्थेची इतर अनेक प्रकाशने आहेत. धार्मिक क्षेत्राप्रमाणेच सामाजिक कार्यातही संस्था प्रारंभापासून कार्यरत राहिलीं असून समाजसेवेचे अनेक प्रकल्प देशाच्या विविध भागांमध्ये या संस्थेच्या वतीने चालविले जातात. या संस्थेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्या असे की, धर्म सोडून मुद्रणाच्या अन्य क्षेत्रात प्रगती करण्याची संधी असतानाही संस्थेने तसे केलेले नाही. आपली निष्ठा केवळ हिंदू धर्माच्या ग्रंथांचा प्रसाराला या संस्थेने वाहिली आहे. तिच्या संस्थापकांनी भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात भाग घेतला होता आणि कारावासही भोगला होता. ही सर्व पार्श्वभूमी लक्षात घेता संस्थेचा हा पुरस्कार देऊन केलेला गौरव उचित आहे, असे बव्हंशी साऱ्यांचे मत आहे. भारताच्या जवळपास 30 कोटी घरांमध्ये हिंदू धर्माचे ग्रंथ किमान दरात पोहचविण्याचे कार्य संस्थेने केल्याने ती भारतात बहुतेकांना परिचित आहे. कोणीही या संस्थेला हा पुरस्कार घोषित केल्याच्या संदर्भात आक्षेप घेतलेला नाही. तथापि, काही राजकीय पक्षांनी या निर्णयावर टीका करुन विनाकारण वाद ओढवून घेतला. त्याची काही आवश्यकता नव्हती. गीता प्रेसला हा पुरस्कार देणे, याचा अर्थ, सावरकर आणि नथुराम गोडसेला पुरस्कार देण्यासारखे आहे, अशी टीका काही राजकीय नेत्यांनी केली. ती पूर्णत: अनुचित आणि अनाठायी आहे. या संस्थेचे महात्मा गांधींशी पटत नव्हते. भारताचे ‘हिंदूकरण’ करण्याचे या संस्थेचे ध्येय आहे. त्यामुळे या संस्थेला गांधी शांतता पुरस्कार देणे हे जखमेवर मीठ चोळल्यासारखे आहे, असा सूर काही टीकाकारांनी आणि राजकीय पक्षांच्या नेत्यांनी लावला होता. ही टीका करण्यासाठी अक्षया मुकुल यांनी लिहिलेल्या ‘गीता प्रेस अँड द मेकिंग ऑफ हिंदू इंडिया’ या पुस्तकाचा आधार घेण्यात आला. कोणत्याही संस्थेसंबंधी प्रत्येकाचे मत अनुकूल असेलच असे नाही. तसेच प्रत्येक प्रतिकूल मत योग्य किंवा तथ्याधारित असतेच असेही म्हणता येत नाही. प्रत्येक लेखक किंवा अभ्यासकाचे स्वत:ची एक विचारसरणी असते आणि ती त्याच्या लेखनामध्ये प्रतिबिंबित होत असते. याचा अर्थ तेच प्रमाण मानले पाहिजे असा नाही. गांधीजींना विरोध केवळ गीता प्रेस या एकाच संस्थेने केला होता, असे मुळीच नाही. त्यांच्या विरोधकांची संख्या मोठी होती आणि आजही आहे. त्यांच्या समकालीन असणाऱ्या अनेक मान्यवरांनी त्यांच्यावर अनेकदा टीका केलेली आहे. त्यांच्या धोरणांना, कृतीला आणि विचारसरणीला विरोध केला आहे आणि त्रुटीही दाखवून दिल्या आहेत. कोणत्याही महनीय व्यक्ती आणि संस्थेला अशा प्रकारच्या वैचारिक विरोधाला समोरे जावे लागतेच, आणि त्यांची या महनीयांनी तयारीही ठेवलेली असते. प्रत्यक्ष काँग्रेसमध्येही अनेक नेत्यांनी अनेकदा त्यांच्या धोरणांना विरोध केलेला आहे, असे त्यावेळचा इतिहास पाहिला असता दिसून येते. दुसरी बाब अशी की भारतीय नागरीकांच्या व्यक्तीगत आणि सामाजिक जीवनात धर्माचे असलेले महत्त्व गांधीजींनी अत्यंत बारकाईने लक्षात घेतलेले नव्हते काय? ते स्वत: धर्माचे आधिष्ठान मानीत असत. त्यामुळे केवळ गांधींजींना असलेला विरोध हे कारण एखाद्या संस्थेला प्रतिष्ठित पुरस्कार न देण्यासाठी पुरेसे ठरु शकत नाही. केवळ तेव्हढ्या निकषावर निर्णय घेतले जाऊ शकत नाहीत. एखाद्या संस्थेचे किंवा व्यक्तीचे सर्वंकष कार्य आणि त्या कार्याचे परिणाम लक्षात घेऊन त्यांचा गौरव कशा प्रकारे करायचा याचा निर्णय घेतला जातो. हे तत्व लक्षात घेतले, तर गीता प्रेसचा या पुरस्काराने गौरव कारण्यात वावगे वाटण्याचे काहीच नाही. पण प्रत्येक बाबीचे राजकारण करण्याचा चंग ज्यांनी बांधलेला असतो, त्यांना अशा निर्णयात दोष दिसतात. यातून काहीही साध्य होत नाही. अशा स्थितीत सर्वांनीच उदारपणा दाखविण्याची आवश्यकता असून प्रत्येक निर्णयाकडे विशिष्ट रंगाच्या चष्म्यातून पाहण्याची आवश्यकता नसते. हिंदू धर्मासंबंधी कोणाचीही मते काहीही असू शकतात. पण भारतात हिंदूंची संख्या प्रचंड आहे आणि त्यामुळे भारताच्या समाजजीवनावर हिंदू धर्माचा प्रभाव असणे स्वाभाविक आहे, हे प्रत्येक संबंधिताने लक्षात घेतल्यास बरेच अनावश्यक वाद टाळता येणे शक्य आहे.
Next Article मेदव्हेदेव विजयी, सित्सिपस पराभूत
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








