मध्यप्रदेशातील गुना येथील घटना
वृत्तसंस्था/ भोपाळ
मध्यप्रदेशातील गुना जिल्ह्यातील राघोगड तालुक्यातील पिपल्या गावात बोअरवेलमध्ये पडलेल्या 10 वर्षीय सुमित मीना उघड्या बोअरवेलमध्ये पडला होता. त्याला सुमारे 16 तास चाललेल्या बचाव कार्यानंतर बाहेर काढण्यात आले. मात्र दुर्दैवाने रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. शनिवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास सुमित पतंग उडवत गावातील एका शेतात पोहोचला. याचदरम्यान शेतात एका उघड्या बोअरवेलमध्ये तो पडला. बराच वेळ तो घरी न परतल्याने कुटुंबीय व ग्रामस्थांनी त्याचा शोध सुरू केला. बोअरवेलच्या ख•dयात मुलाचे डोके दिसताच कुटुंबीय व ग्रामस्थांनी प्रशासनाला माहिती दिली. त्यानंतर बचावकार्य सुरू झाले. मात्र, 16 तास मेहनत करूनही त्याचा जीव वाचवता आला नाही.
बोअरवेलमध्ये पडलेला सुमित जवळपास 30 फूट खोलीवर अडकला होता. बचावकार्यासाठी राघोगड येथून मागविलेल्या जेसीबीद्वारे रात्रभर खोदकाम करण्यात आले. भोपाळहून आलेल्या एनडीआरएफ पथकाने बचावकार्य हाती घेतले. रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास सुमितला बोअरवेलमधून बाहेर काढण्यात आले. एनडीआरएफ आणि आरोग्य विभागाच्या पथकाने त्याला स्ट्रेचरवर ठेवले आणि तातडीने रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केले. सुमितच्या मृत्यूमुळे वडील दशरथ मीना आणि इतर कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. या घटनेने संपूर्ण गाव शोकमग्न झाले आहे.









