कुमठोळ काजरेधाट धबधब्यावरील दोघे जण बुडाल्याची घटना : आज नौदलाच्या मदतीने शोधमोहीम राबविणार

प्रतिनिधी /वाळपई
कुमठोळ सत्तरी काजरेधाट येथे सोमवारी वास्को येथील दोन तरुण बुडाले होते. पैकी शशी सोमनाळ यांचा मृतदेह सोमवारी रात्री उशिरा सापडला होता. दुसरा तरुण गौरव सिंग यांचा शोध लागला नव्हता. मंगळवारी दिवसभर वाळपई अग्निशामक दलाने अथक प्रयत्न करूनही उशिरापर्यंत शोध लागला नाही. दरम्यान, बुधवारी यासाठी नौदलातर्फे पुन्हा एकदा शोधमोहीम राबविली जाईल.
वास्को येथील एकूण आठ तरुणांचा एक गट सहलीसाठी कुमठोळ काजरेधाट या ठिकाणी आला होता. आंघोळ करताना अचानकपणे शशी सोमनाळ व गौरव सिंग बुडाले होते. यापैकी शशी सोमनाळ यांचा मृतदेह सापडला होता. तर गौरव सिंग यांचा अद्याप पत्ता लागला नाही.
मंगळवारी सकाळी पुन्हा अग्निशामक जलाच्या जवानांनी जोरदार शोधमोहीम राबविली. मात्र संध्याकाळी उशिरापर्यंत त्यांचा पत्ता लागला नाही. या संदर्भात ज्या ठिकाणी सदर तरुण बुडाले होते. त्या ठिकाणापासून नदीच्या जवळपास पाचशे मीटर अंतरावर त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न जवानांकडून करण्यात आला. मात्र यश आले नाही, अशी माहिती अग्निशामक दलाचे अधिकारी संतोष गावस यांनी दिली.
सध्या जोरदार पाऊस कोसळत असल्यामुळे जोरदार प्रवाहात वाहून जाण्याची शक्यता!
डोंगराळ भागामध्ये पाऊस लागत आहे?. त्यामुळे जोरदार प्रवाहाने पाणी वाहत असल्याने वाहून जाण्याची शक्मयता व्यक्त करण्यात येत आहे.
त्याचप्रमाणे स्थानिकांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, ज्या ठिकाणी हे तरुण बुडाले होते. त्या ठिकाणी नदीचे पात्र खोल आहे. यामुळे सदर पात्रांमध्ये सदर मृतदेह अडकण्याची शक्मयता आहे. नदीचे पात्र खोल असल्याने तळाला जाऊन शोध घेणे धोकादायक आहे. या नदीत मगरींचा वावरही आहे. दरम्यान, बुधवारी सकाळपासून पुन्हा शोधमोहीम सुरू केली जाईल, अशी माहिती दलाचे अधिकारी संतोष गावस यांनी दिली.
धोकादायक धबधब्यावर प्रतिबंध घालावा!
दरम्यान, काजरेधाट भागामध्ये अशा प्रकारे पर्यटक बुडण्याची घटना पहिल्यांदाच घडली आहे. या घटनेमुळे गावाची बदनामी होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. यामुळे या धबधब्यावर येण्यापासून पर्यटकांना प्रतिबंध घालावा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. पोलीस यंत्रणेने याकडे विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन स्थानिक नागरिकांनी केलेली आहे. अभयारण्याच्या व्यवस्थापनाकडून पर्यटकांकरवी शुल्क आकारले जाते. मात्र हे शुल्क आकारत असतील तर पर्यटकांच्या सुरक्षेबाबतही संबंधित प्रशासनाने विशेष लक्ष देणे, अत्यंत गरजेचे आहे, असे मत स्थानिकांतून व्यक्त होत आहे.









