भरती प्रक्रियेची मुदत आज येणार संपुष्टात : ‘क’ वर्गातील पदांची भरती आता आयोगाकडे
पणजी : सरकारी खात्यांची चालू करण्यात आलेली भरती प्रक्रिया पूर्ण करण्याची मुदत आज 31 ऑक्टोबर 2023 रोजी संपुष्टात आली असून सरकारला ती भरती पूर्ण करण्यास अपयश आले आहे. त्यामुळे आता त्यातील ‘क’ वर्गातील पदांची भरती कर्मचारी भरती आयोगाकडे (स्टाफ सिलेक्शन कमिशन) देण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. विधानसभा निवडणूक 2022 पूर्वी हजारो पदांची भरती करण्याचा बेत सरकारने आखला होता आणि त्यानुसार विविध सरकारी खात्यांनी जाहिराती देऊन अर्ज मागवले होते. काही सरकारी खात्यातील पदांसाठी लेखी परीक्षा घेण्यात आली, त्या परीक्षेचा निकालही लावण्यात आला नाही. काही खात्यांतर्फे पदांसाठी मुलाखती घेण्यात आल्या परंतु प्रत्यक्षात एकाही खात्याने भरती केली नाही. हे सर्व होऊन आता दीड वर्ष संपले तरी भरती होत नसल्याने त्याकरीता अर्ज केलेले व नोकरीच्या प्रतीक्षेत असलेले उमेदवार कंटाळले, निराश झाले असून ते सरकारकडे संबंधित खात्यात जाऊन विचारणा करीत आहेत परंतु त्यांना समाधानकारक उत्तरे न मिळता उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत आहेत. त्यांची भरती तातडीने होण्यासाठी 31 ऑक्टोबरची मुदत सरकारनेच निश्चित केली होती. ती मुदत आता संपली तरी भरती लोंबकळत राहिली असून ती केव्हा होणार याचा मात्र पत्ता नाही. आता सदर भरती (क वर्ग) आयोगाकडे देण्याचे सरकारने ठरवल्याचे वृत्त हाती आले आहे.








