विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांची टीका
मडगाव : आणखी एका भीषण अपघाताने आणखी तिघांचे जीव घेतले. कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांचे कायदा उल्लंघन करणाऱ्यावर नियंत्रण नसल्याचे या घटनेने परत एकदा उघड झाले आहे. मद्यधुंद वाहन चालवणे सुरूच आहे. काळ्या काचेच्या गाडीतून मृतदेह सीमेपलीकडे घेऊन गेले तरी पोलिसांना त्याची माहिती नसते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आतातरी जबाबदारी निश्चित करणार की, दोषारोपाचा खेळ सुरूच ठेवणार ? असा संतप्त सवाल विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी विचारला आहे. तिघांचे बळी घेवून दोघांना गंभीर जखमी केलेल्या पर्वरीतील भीषण अपघातावर प्रतिक्रिया देताना, विरोधी पक्षनेते म्हणाले, ‘आता बस्स झाले, आता या घटना थांबल्याच पाहिजेत’.
मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवल्यामुळे बाणस्तारी येथे झालेल्या भीषण अपघातातून भाजप सरकारने अजूनही धडा घेतलेला नाही असे दिसते. पर्वरी येथे झालेल्या अपघाताने कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी ज्यावेळी प्रत्यक्षात जागृत राहायला हवे नेमके त्यावेळीच ते गाढ झोपेत होते हे स्पष्ट झाले असा टोला युरी आलेमाव यांनी हाणला आहे. दोन दिवसांपूर्वी गोव्याच्या सीमेबाहेर एका काळ्या काचेच्या वाहनातून मृतदेह नेण्यात आला होता. सदर घटनेने चेकपोस्टवरील पोलीस, आरटीओ, उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकतर सदर मुलीच्या मारेकऱ्यांशी हातमिळवणी केली होती किंवा त्यांच्या कर्तव्य बजावण्यात ते सर्व अपयशी ठरले हे स्पष्ट झाले आहे. अधिकाऱ्यांच्या अशा बेजबाबदार वृत्तीमुळेच गुन्हेगारी घटना आणि जीवघेणे अपघात होतात, असा दावा युरी आलेमाव यांनी केला.
तरूणांनी जबाबदारीने वागावे…
कुटुंबे उध्वस्त होत आहेत. मी तऊणांना आवाहन करतो की, त्यांनी जबाबदारीने वागावे. माझी पालकांनाही विनंती आहे की, त्यांनी त्यांच्या मुलांवर लक्ष ठेवावे. अतिसाहसाचा परिणाम वाईट होतो हे आपण सर्वांनी समजून घेऊया असे युरी आलेमाव यांनी म्हटले आहे. गोव्यातील असंवेदनशील आणि बेजबाबदार भाजप सरकारकडून कोणतीही आशा नसल्याने नागरिकांनी शिस्तबद्ध जीवनशैली अंगीकारण्याची वेळ आली आहे. मी सर्व गोमंतकीयांना सुरक्षित राहण्याचे आवाहन करतो, असे युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.









