मंत्री सतीश जारकीहोळी यांचे आवाहन : सतीश प्रतिभा पुरस्कार वितरण कार्यक्रमाची सांगता
बेळगाव : सतीश प्रतिभा पुरस्कारामध्ये भाग घेतलेले काही विद्यार्थी जिंकले आहेत. काही विद्यार्थी पराजित झाले आहेत. मात्र, पराजित झालेल्या विद्यार्थ्यांनी मनाला लावून घेऊ नये. कारण पुढील वर्षी पुन्हा संधी मिळणार आहे, असे आवाहन जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी केले. यमकनमर्डी येथील एनएसएस शाळा मैदानाच्या आवारामध्ये प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आयोजित दहाव्या सतीश प्रतिभा पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या सांगता समारंभात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. ते म्हणाले, गेल्या दोन दिवसांपासून हा कार्यक्रम सुरू आहे. हा कार्यक्रम यशस्वी झाला असून कोरोना काळात हा उपक्रम स्थगित ठेवण्यात आला होता.
मात्र, विद्यार्थ्यांवर असलेल्या प्रेमापोटी हा उपक्रम पुन्हा सुरू करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. या व्यासपीठाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील प्रतिभावंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे काम होत आहे, ही आनंदाची बाब आहे. दहा वर्षांपूर्वी हा उपक्रम सुरू केला होता. याला आता मोठे स्वरुप प्राप्त झाले आहे. या उपक्रमातून विजयी झालेल्या विद्यार्थ्यांनी राज्य, राष्ट्र पातळीवर नावलौकिक करावा, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. यावेळी आमदार गणेश हुक्केरी, आमदार राजू सेठ, आमदार विश्वनाथ वैद्य, आमदार बाबासाहेब पाटील, बेळगाव काँग्रेस ग्रामीणचे अध्यक्ष विनय नावलगट्टी, प्रदीप एम. जे., राहुल जारकीहोळी, हुक्केरीचे चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी, महावीर मोहिते, अरुण कटांबले, किरण रजपूत आदी मान्यवर उपस्थित होते.









