ऑनलाईन टीम / तरुण भारत :
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानेच आमच्या बंडाला सुरूवात झाली, असा गौप्यस्फोट मंत्री तानाजी सावंत यांनी केला आहे. सावंत यांच्या या गौप्यस्फोटाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
परंडा शहरात कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमावेळी ते बोलत होते. सावंत म्हणाले, बंडासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मी तब्बल 100 ते 150 बैठका केल्या आहेत. सत्तांतरासाठी मी पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, आणि विदर्भातील आमदारांचे काऊन्सलिंग करत होतो. बंडासाठी मी कोणतीही गोष्ट झाकून ठेवली नव्हती. सर्व गोष्टी सांगून करत होतो. देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानेच आमच्या बंडाला सुरूवात झाली होती.
30 डिसेंबर 2019 ला मंत्रीमंडळाचा विस्तार झाला. त्यानंतर 3 जानेवारीच्या दरम्यान सुजितसिंह ठाकूर मी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने महाराष्ट्रात पहिल्यांदा बंडखोरी करुन शिवसेना-भाजपची जिल्हा परिषद आणली. धाराशीव जिल्ह्यातून याची सुरुवात झाली होती. तेव्हापासूनच मी बंडाचे निशाण फडकावले होते, असेही सावंत म्हणाले.








