ऑनलाईन टीम / तरुण भारत :
नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातील घटनेनंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस ऍक्शन मोडवर असून, त्यांनी या प्रकरणी कडक कारवाई आदेश पोलीस प्रशासनाला दिले आहेत. तसेच या घटनेच्या चौकशीसाठी अतिरिक्त पोलिस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत एसआयटी स्थापन करण्याचे आदेश ही त्यांनी दिले आहेत.
शनिवारी त्र्यंबकेश्वर मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातून बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न जमावाकडून झाला होता. मात्र, सुरक्षारक्षकांनी त्यांना मंदिरात जाण्यापासून रोखले. यावेळी देवस्थानचे पदाधिकारी आणि पोलिसांच्या मध्यस्थीने हा वाद निवळला होता. या घटनेनंतर दोन दिवसांनी त्र्यंबकेश्वर मंदिर प्रशासनाने पोलिसांना पत्रव्यवहार करत घटनेच्या चौकशीची मागणी केली. त्यानंतर पोलीस प्रशासन अलर्ट झालं. गृहमंत्री फडणवीस यांनी या घटनेची तात्काळ दखल घेत या घटनेसंदर्भात एफआयआर नोंदवून पोलीस प्रशासनाला कारवाईचे आदेश दिले आहेत. तसेच या घटनेच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश ही फडणवीस यांनी दिले आहेत.








