त्या’ चार महिलांचा शोध नाहीच : पोलीस आयुक्तांना निवेदन देऊनही कार्यवाही शून्य
प्रतिनिधी/ बेळगाव
उद्यमबाग औद्योगिक वसाहतीत धुमाकूळ घालणाऱ्या ‘त्या’ चार महिला अद्याप मोकाट आहेत. हातात धारदार शस्त्रs घेऊन औद्योगिक वसाहतीत फिरणाऱ्या ‘होय, आम्हीच चोरी केली आहे, तुम्हाला काय करायचे आहे ते करा!’ असे कारखानदारांना धमकावणाऱ्या महिलांना अटक करावी, अशी मागणी तेथील कारखानदारांनी पोलीस आयुक्तांकडे करूनही त्याचा उपयोग झाला नाही.
उद्यमबाग येथील बँक ऑफ बडोदाची भिंत फोडण्याचा प्रयत्न झाला होता. 28 जानेवारी 2024 रोजी सकाळी हा प्रकार उघडकीस आला होता. याचवेळी परिसरातील काही कारखानेही फोडल्याचे उघडकीस आले होते. ड्रिल ब्रेकरच्या साहाय्याने बँकेवर दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला होता.
या घटनेनंतर लगेच दुसऱ्या दिवशी कारखानदारांनी पोलीस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा यांची भेट घेऊन उद्यमबाग परिसरातील परिस्थितीची त्यांना जाणीव करून दिली होती. औद्योगिक वसाहतीत चार महिला हातात शस्त्रs घेऊन उघडपणे फिरत असतात. ‘आम्हीच चोरी केली आहे, तुम्हाला काय करायचे आहे ते करा’ असे उघडपणे कारखानदारांना धमकावत असतात. याकडे पोलीस आयुक्तांचे लक्ष वेधण्यात आले होते.
5 जानेवारी 2024 रोजी एम. डी. इंजिनिअरिंग या कारखान्यात चोरीचा प्रकार घडला होता. चोरट्यांनी दीड लाखाचे साहित्य पळविल्याचे उघडकीस आले होते. औद्योगिक वसाहतीत धुमाकूळ घालणाऱ्या त्या चार महिलांची छबी सीसीटीव्हीत कैद झाली होती. संबंधितांनी उद्यमबाग पोलिसांना ते फुटेज देऊनही या चोरी प्रकरणाचा छडा लावण्यात आला नाही.
एखाद्या चोरीच्या घटनेनंतर फिर्याद देण्यासाठी पोलीस स्थानकाला जाणाऱ्या कारखानदारांवरच पोलीस अरेरावी करतात, असा आरोप करण्यात आला होता. त्वरित गुन्हेगारांचा शोध घेण्याचे आश्वासन पोलीस आयुक्तांनी दिले होते. बँक फोडण्याच्या घटनेला 20 दिवस पूर्ण व्हायला आले तरी अद्याप त्याचा छडा लागला नाही. औद्योगिक वसाहतीत धुमाकूळ घालणाऱ्या महिलांनाही अद्याप अटक झाली नाही. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.









