‘सहकार महापरिषदे’त शरद पवारांची सूचना
पुणे : राज्यात सहा हजार मेगावॉट विजेचा तुटवडा आहे. कारखान्यांनी वीज उत्पादित केल्यास राज्याची गरज भागू शकेल. त्यादृष्टीने सहकारी साखर कारखान्यांनी पुढाकार घेऊन सहवीज निर्मिती प्रकल्प सुरू करावेत, अशी सूचना माजी केंद्रीय कृषिमंत्री, खासदार शरद पवार यांनी शुक्रवारी येथे केली. ‘लोकमान्य मल्टिपर्पज को.ऑपरेटिव्ह सोसायटी’ प्रस्तुत व ‘सकाळ’ माध्यम समूह आयोजित दुसऱ्या दोन दिवसीय सहकार महापरिषदेला शुक्रवारपासून सुऊवात झाली. याच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पवार बोलत होते. यावेळी विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष किरण ठाकुर, ‘सकाळ’ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार, राज्य सहकारी बँकेच्या प्रशासक मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, आमदार प्रवीण दरेकर, रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे, एस. एस. इंजिनिअर्सचे प्रकल्प प्रमुख शहाजी भड, ‘सकाळ’चे संचालक संपादक श्रीराम पवार आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, राज्यात सहा हजार मेगावॉट विजेचा तुटवडा आहे. सध्या साखर कारखाने अडीच हजार मेगावॉट इतर वीजनिर्मिती करत आहेत. बगॅसमधून आणखी तीन हजार सहाशे मेगावॉट वीज मिळेल. त्यासाठी कारखान्यांनी पुढाकार घ्यावा. कारखान्यांनी वीज उत्पादित केल्यास राज्याची गरज भागेलच. शिवाय कारखान्यांना आर्थिक फायदा होऊ शकेल. सध्या विजेचे दर चांगले आहेत. मात्र, भविष्यात राज्य सरकारने दर कमी केले, नुकसान होऊ शकते. यासाठीच कारखान्यांनी आर्थिक व व्यावसायिक व्यवस्थापन चांगले केले पाहिजे यंदा देशात सर्वाधिक साखर उत्पादन महाराष्ट्रात झाले आहे. त्यामुळे सहकारी कारखान्यांनी आता साखर उत्पादन कमी करून इथेनॉल, कॉम्प्रेस्ड बायो गॅस (सीबीजी), नायट्रोजन, हायड्रोजन व सहवीज निर्मिती यासारख्या विविध प्रकारच्या उत्पादनांवर अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे, अशी अपेक्षाही व्यक्त केली
सहकारी संस्थांचे महाराष्ट्रात मोठे काम : किरण ठाकुर
किरण ठाकुर म्हणाले, सहकारी संस्थांनी महाराष्ट्रात फार मोठे काम केले आहे. त्यातून सहकारी चळवळ उभी राहिली. ‘लोकमान्य सोसायटी’चेही काम जोमात सुरू आहे. पुण्यात ‘लोकमान्य’ सोसायटीच्या विविध शाखांमध्ये 2 हजार 200 कोटींच्या ठेवी आहेत. सहकारी संस्थांवर कमीत कमी बंधने असावीत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.