पर्यटनमंत्री एच. के. पाटील यांची माहिती : दासोह भवन, पायाभूत सुविधांसाठी मास्टरप्लॅन तयार : आराखडा संकेतस्थळावरही प्रसिद्ध होणार
बेळगाव : माघी पौर्णिमेदरम्यान सौंदत्ती यल्लम्मादेवी डोंगरावर होणाऱ्या गर्दीचे योग्य व्यवस्थापन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येणार आहे. डोंगरावरील पार्किंग, स्वच्छतागृहे, एलईडी लाईट बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. तसेच तिरुपती तिरुमला देवस्थानच्या धर्तीवर विकास करण्याचे प्रयत्न असल्याचे पर्यटन विभागाचे मंत्री एच. के. पाटील यांनी सांगितले. बुधवार दि. 5 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मंत्री एच. के. पाटील बोलत होते. डोंगरावर भक्तांना अन्न शिजवण्यासाठी सोय व जनावरांसाठी चारा छावणी उभारण्याचे काम महिनाभरात सुरू केले जाणार आहे. डोंगराच्या विकासासाठी टीटीडी मॉडेलवर आधारित योजना तयार केली जाईल, असे ते म्हणाले. सौंदत्ती विकास मंडळाने प्रगतीचा आढावा घेतला असून किरकोळ कायदेशीर अडचणी जिल्हा प्रशासनाकडून सोडविण्यात आल्या आहेत.
केंद्राने शंभर कोटी मंजूर केले आहेत. एवढेच नाही तर प्रसाद योजनेंतर्गत 20 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. याशिवाय राज्य सरकारकडून भरघोस अनुदानही दिले जात आहे. दासोह भवन, पायाभूत सुविधांसाठी मास्टरप्लॅन जवळपास तयार आहे. हा आराखडा संकेतस्थळावरही प्रसिद्ध करण्यात येणार असून लोकांकडून सूचना मागवल्या जाणार आहेत. दासोह भवन उभारल्यानंतर दासोह सोहळा सुरू करण्यात येणार आहे. सौंदत्ती डोंगरावर उघड्यावर शौचास बसण्याची समस्या गांभीर्याने घेतली असून स्वच्छतागृहांसह आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी मंत्री एच. के. पाटील यांच्या हस्ते पर्यटनविषयक माहिती पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद, सौंदत्ती यल्लम्मा पर्यटनच्या गीता कौलगी, सौम्या बापट उपस्थित होते.
भीमगड आकर्षक पर्यटनस्थळ होईल…
गोकाक फॉल्स येथे रोप कार प्रकल्प तयार केला जात आहे. भीमगड भागात 18 किलोमीटर परिसर सफारीसाठी मोकळा होत आहे. ते सुरू झाल्यानंतर भीमगड हे आकर्षक पर्यटनस्थळ होईल, असे पाटील म्हणाले.









