वार्ताहर /किणये
बिजगर्णी ते कर्ले या संपर्क रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत. तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजुने झाडाझुडूपांची वाढ झालेली आहे. या खाड्यांमुळे अनेक किरकोळ अपघाताच्या घटना घडलेल्या आहेत. गेल्या अनेक महिन्यापासून स्थानिक वाहनधारक या रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची मागणी करीत आहेत. या रस्त्याचे कामकाज सुरळीत करण्यात यावी, अशी मागणी बिजगर्णी, कावळेवाडी भागातील नागरिकांतून होत आहे. बिजगर्णी, कावळेवाडी, कर्ले या पश्चिम भागातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात येणार आहेत. त्यासाठी काही ठिकाणी खडी टाकण्यात आली आहे. या रस्त्यांवर असणाऱ्या छोट्या पुलांवर पांढरा रंग लावण्यात येऊ लागला आहे. तसेच रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडेझुडूपे काढण्यात येऊ लागली आहे. मात्र हे काम योग्यप्रकारे होत नाही, अशा तक्रारी नागरिक करीत आहेत.
…अन्यथा सार्वजनिक बांधकामकडे तक्रार करू!
कावळेवाडी, बिजगर्णी, कर्ले या संपर्क रस्त्यांची दुरुस्ती करण्याचे कामकाज हाती घेतले आहे. सध्या रस्त्याच्या बाजूने असलेली झाडाझुडूपांची साफसफाई करण्यात येत आहे. मात्र हे काम व्यवस्थित होत नाही. साफसफाई करण्याचे केवळ सोंग करण्यात येत आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी व कंत्राटदारांनी हे काम योग्यप्रकारे करण्याची गरज आहे. अनेक महिन्यांपासून या रस्त्यासाठी स्थानिकांनी मागणी केली आहे. त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती व साफसफाई चांगल्याप्रकारे करावी, अन्यथा आम्ही सार्वजनिक बांधकाम खात्याकडे तक्रार करू.
– अॅड. नामदेव मोरे, कावळेवाडी









