गोव्याचे सभापती रमेश तवडकर यांचे प्रतिपादन : सावगाव येथे किल्ला स्पर्धेचे बक्षीस वितरण, गुणी विद्यार्थ्यांचा गौरव
वार्ताहर /किणये
सध्याच्या आधुनिक युगात माणसांना बरीच धावपळ करावी लागते. तुम्ही जो व्यवसाय, नोकरी करता त्यामध्ये व विद्यार्थ्यांच्या अभ्यासामध्ये सातत्य हवे. कोणत्याही अडचणीच्यावेळी न डगमगता हिमतीने परिस्थितीचा सामना करावा. दुर्बल होऊन जगू नका, तर सबळ बनून धैर्याने संकटांचा सामना करायला शिका, असे मनोगत गोव्याचे सभापती रमेश तवडकर यांनी सावगाव येथे व्यक्त केले. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सावगाव व शिवस्मारक सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने किल्ला स्पर्धांचा बक्षीस वितरण, गुणी विद्यार्थी तसेच उत्कृष्ट खेळाडू यांचा सत्कार असा संयुक्त कार्यक्रम रविवारी सायंकाळी शिवस्मारक लक्ष्मी चौक, सावगाव येथे पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे या नात्याने गोव्याचे सभापती रमेश तवडकर हे मार्गदर्शन करताना बोलत होते. विद्यार्थी व तरुणांनी मोबाईलमध्ये अधिक वेळ वाया घालवू नये. मोबाईलमध्ये अधिक गुरफटत राहू नका. सुदृढ आरोग्यासाठी विविध खेळ खेळावे, तसेच आपल्या आई-वडिलांची सेवा करावी, असेही त्यांनी सांगितले.
गोव्यामध्ये लोकोत्सवाच्या माध्यमातून लोकांना रोजगार
गोव्यामध्ये लोकोत्सवाच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला जातो, असे वेगवेगळे उपक्रम बेळगावमध्येही राबविले पाहिजेत. गोवा हे केवळ मनोरंजन, समुद्र इतकेच नाही. गोव्याच्या संस्कृतीचे दर्शनही लोकोत्सवामध्ये घडते. येणाऱ्या दि. 7 ते 10 पर्यंत लोकोत्सव होणार आहे. त्या सोहळ्यात सावगावमधून मोठ्या संख्येने उपस्थित रहा, गोवा आणि बेळगावचं नात अधिक वृद्धिंगत करण्यासाठी सहभागी व्हा, असे आवाहनही त्यांनी केले. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन सभापती रमेश तवडकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे व विश्वभारत कला-क्रीडा फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अनिल देसाई, सेक्रेटरी रविंद्र बिर्जे आदींच्या हस्ते दीपप्रज्वलन केले. किल्ला स्पर्धां, रांगोळी, गुणी विद्यार्थी तसेच सामाजिक व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगाव तालुका कार्यवाह कल्लाप्पा पाटील, देवस्की पंच कमिटीचे सदस्य, ग्राम पंचायत सदस्य उपस्थित होते. त्यानंतर मलखांब व मर्दानी खेळाचे सादरीकरण केले. यावेळी पंचक्रोशीतील धारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.









