डास, पाल, झुरळ, कोळी आणि ढेकणांपासून लोक दूर राहणेच योग्य मानतात. या प्राण्यांना पळवून लावण्यासाठी वेगवेगळय़ा प्रकारच्या उत्पादनांचा वापर केला जातो. किचनमध्ये तर झुरळांचीच दहशत असते. अशा स्थितीत अमेरिकेतील एका कंपनीची झुरळांशी निगडित एक अनोखी ऑफर सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. ही कंपनी लोकांना ‘झुरळ पाळण्यासाठी’ दीड लाख रुपये देण्यास तयार आहे.
अमेरिकेत नॉर्थ कॅरोलिनामधील ‘पेस्ट कंट्रोल कंपनी’ स्वतःच्या नव्या पेस्ट कंट्रोल औषधावर अध्ययन करत आहे. याच संशोधनासाठी त्यांना झुरळयुक्त घरांची गरज आहे. कंपनी देशात 5-7 घरांच्या मालकांचा शोध घेत आहे, ज्यांच्या घरात किमान 100 झुरळ सोडण्याचा विचार आहे. जर त्यांना असे घर मिळाले तर ते मालकाला 2 हजार डॉलर्सची रक्कम देणार आहेत.

काही अटी पाळाव्या लागणार
100 झुरळ घरात सोडल्यावर घरमालकाला 30 दिवसांपर्यंत कुठल्याही प्रकारच्या पेस्ट कंट्रोल तंत्रज्ञानाचा वापर करता येणार नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. कंपनी स्वतःच्या पद्धतीने झुरळांचे संक्रमण दूर करणार आहे. जर पेस्ट इन्फॉर्मर कंपनीच्या महिन्याभराच्या संशोधनानंतर घरात झुरळ शिल्लक राहिल्यास कंपनी त्यांना पळवून लावण्यासाठी पारंपरिक पद्धतींचा वापर करणार आहे. तसेच हे अध्ययन कुटुंब आणि पाळीव प्राण्यांसाठी पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा कंपनीने केला आहे. या योजनेत सामील होण्यासाठी घरमालकाचे वय किमान 21 वर्षे असणे आवश्यक आहे.









