अमेरिकेच्या निर्णयामुळे नाराजी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पाकिस्तानला एफ-16 लढाऊ विमानांसाठी देण्यात आलेल्या पॅकेजप्रकरणी भारताने अमेरिकेसमोर तीव्र आक्षेप नोंदविला आहे. दक्षिण आणि मध्य आशियाई विषयक अमेरिकेचे सहाय्यक विदेशमंत्री डोनाल्ड लू यांच्यासमोर भारताने स्वतःचा विरोध नोंदविण्यासह या निर्णयाच्या टायमिंगवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पाकिस्तानसाठी हे पॅकेज ट्रम्प प्रशासनाचा निर्णय पालटवून देण्यात आले आहे. पाकिस्तानी वायुदलाकडे असलेल्या एफ-16 या लढाऊ विमानांना अपग्रेड करण्याचा निर्णय अमेरिकेकडून घेण्यात आला आहे.
अमेरिकेने या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल भारताला कल्पना दिली नव्हती. अमेरिकेने निर्णय जाहीर केल्यावर डोनाल्ड लू यांच्यासोबतच्या सर्व बैठकांमध्ये यासंबंधीचा मुद्दा भारताने अत्यंत आक्रमकतेने मांडला आहे. अमेरिका भारताच्या सुरक्षा हितसंबंधांचा विचार करून निर्णय घेईल अशी अपेक्षा असल्याने भारताने कळविले आहे. भारताने आतापर्यंत या मुद्दय़ावर जाहीरपणे टिप्पणी केलेली नाही. तर या पॅकेजमध्ये नव्या क्षमता, शस्त्रास्त्रs किंवा युद्धसामग्री सामील नसल्याचे अमेरिकेकडून म्हटले गेले आहे.
पाकिस्तानच्या एफ-16 लढाऊ विमानांचे टार्गेट भारतच राहणार आहे. ही विमाने अत्यंत जुनी असली तरीही या स्थितीत बदल होणार नसल्याचे सरकारचे मानणे आहे. अयमान अल-जवाहिरीला ठार करण्यासाठी स्वतःच्या हवाईक्षेत्राचा वापर करण्याची अनुमती दिल्याने पाकिस्तानला अमेरिकेकडून ही भेट मिळाली असल्याचा दावा तालिबानने केला आहे.
2018 मध्ये ट्रम्प प्रशासनाने दहशतवादी गटांच्या विरोधात कारवाई न केल्याप्रकरणी पाकिस्तानला दिले जाणारे सैन्यसहाय्य रोखले होते. तर जो बिडेन प्रशासनाने या भूमिकेत बदल केला आहे. युक्रेनवरील रशियाच्या हल्ल्यानंतर भारताच्या भूमिकेवरून अमेरिकेशी काही प्रमाणात मतभेद निर्माण झाले आहेत. अमेरिकेच्या दबावानंतरही भारताने स्वतःची भूमिका कायम ठेवली आहे.
अमेरिकेचे स्पष्टीकरण
पाकिस्तानला देण्यात आलेल्या मदतीत कुठलेही विमान किंवा शस्त्रास्त्रs सामील नाहीत. स्वतःच्या सुरक्षा शस्त्रास्त्रांची देखभाल करता यावी म्हणून ही मदत पाकिस्तानला करण्यात येत आहे. पाकिस्तान या रकमेद्वारे अमेरिकेच्या दहशतवादविरोधी लढाईत मदत करणार आहे. यामुळे अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा अन् विदेश धोरणाला बळ मिळणार असल्याचा दावा अमेरिकेचे मंत्री डोनाल्ड लू यांनी केला आहे.









