पायलटचा मृत्यू : एअरशो सरावावेळी दुर्घटना
वृत्तसंस्था/ वॉर्सा
पोलंडमध्ये एका हृदयद्रावक घटनेत गुरुवारी, 28 ऑगस्ट रोजी एअर शो सरावादरम्यान पोलिश हवाई दलाचे एक एफ-16 लढाऊ विमान कोसळले. लढाऊ विमान कोसळल्यानंतर त्याला आग लागल्याने पोलिश सुरक्षा दलाच्या एका वैमानिकाचा मृत्यू झाला. ही घटना मध्य पोलंडमधील राडोम शहरात घडली. अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. या दुर्घटनेनंतर 30-31 ऑगस्ट रोजी होणारा रॅडोम एअरशो 2025 रद्द करण्यात आला. हा पोलंडचा सर्वात मोठा विमानचालन कार्यक्रम होता. हा विमानशो पाहण्यासाठी 1.80 लाख लोक उपस्थित राहण्याची अपेक्षा होती.
अपघातात मृत्युमुखी पडलेले मेजर मॅसिएज ‘स्लॅब’ क्राकोवियन हे वैमानिक एफ-16 टायगर डेमो टीमचे प्रमुख होते. ते पोलंडमधील सर्वात अनुभवी आणि ज्येष्ठ वैमानिकांपैकी एक होते. ज्यांना अलिकडेच ब्रिटनमध्ये झालेल्या रॉयल इंटरनॅशनल एअर टॅटू 2025 मध्ये ‘बेस्ट ओव्हरऑल फ्लाइंग डेमो’ पुरस्कार मिळाला होता. पोलंडचे उपपंतप्रधान व्लादिस्लाव कोसिनियाक-कामिस्झ यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. तसेच हवाई दलाचे मोठे नुकसान झाल्याबद्दल त्यांनी शोक व्यक्त केला.









