दिल्लीच्या हवाईक्षेत्रावर ठेवणार नजर : बालाकोट एअरस्ट्राइकवेळी बजावली होती मोठी भूमिका
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
नवी दिल्ली येथे 9-10 सप्टेंबर रोजी आयोजित होणाऱ्या जी-20 परिषदेत 19 देशांचे प्रतिनिधी सामील होणार आहेत. या परिषदेत अमेरिका तसेच फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत ब्रिटन तसेच जपानचे पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर भारताकडून विदेशी अतिथींच्या सुरक्षेसाठी चोख बंदोबस्त केला जात आहे. भारतीय वायुदल हवाई क्षेत्राच्या सुरक्षेसाठी स्वदेशी टेहळणी आणि देखरेख विमान नेत्र तैनात करण्याची तयारी करत आहे. वायुदलाचे हे विमान फेब्रुवारी 2019 मध्ये बालाकोट एअर स्ट्राइकवेळी चर्चेत आले होते. तेव्हा पाकिस्तानी एफ-16 लढाऊ विमानांवर नजर ठेवण्यासाठी नेत्र तैनात करण्यात आले होते.

दिल्लीच्या हवाई सुरक्षेसाठी क्षेपणास्त्र देखील तैनात करण्यात येणार आहे. तर सैन्याची हेलिकॉप्टर्स हवाई गस्त घालणार आहेत. या हेलिकॉप्टर्समधून एनएसजी कमांडो नजर ठेवणार आहेत. परिषदेच्या आसपासच्या मोठ्या आणि उंच इमारतींवर सैन्य तसेच एनएसजी स्नायपर तैनात असणार आहेत. पहिल्यांदा ड्रोनविरोधी यंत्रणा तैनात करण्यात आली असून यामुळे परिषदेदरम्यान पतंग देखील उडविता येणार नाही.
परिषदेच्या सुरक्षेसाठी दिल्लीत आर्टिफिशियल इंटेलिजेन्स आधारित कॅमेरे देखील बसविण्यात आले आहेत. संशयास्पद हालचाल दिसताच हे कॅमेरे त्वरित सुरक्षा अधिकाऱ्यांना सतर्कतेचा इशारा पाठविणार आहेत. विदेशी अतिथींचे वास्तव्य असलेल्या इमारतींमध्ये ड्रोनविरोधी यंत्रणा आणि बुलेटफ्रूफ काचा बचविण्यात आल्या आहेत. तर आयटी तज्ञांचे पथक परिषदेदरम्यान सोशल मीडिया पोस्ट, ट्रेंड्सवर नजर ठेवून असेल.
भारतीय खाद्यपदार्थांना मिळणार स्थान
जी-20 परिषदेसाठी येत असलेल्या जागतिक नेत्यांना चांदनी चौकमधील विशेष खाद्यपदार्थ आणि मिलेट्ससोबत स्ट्रीड फूडही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जी-20 इंडियाचे विशेष सचिव मुक्तेश परदेशी यांच्यानुसार शिखर परिषदेसाठी 10 हजारांहून अधिक लोक दिल्लीत पोहोचणार आहेत. या विदेशी अतिथींसाठी मेन्यूला अंतिम स्वरुप देण्यासाठी युद्धपातळीवर काम केले जात आहे.
लेफ्ट हँड ड्राइव्ह कार्स
जी-20 परिषदेसाठी केंद्र सरकारने लेफ्ट हँड ड्राइव्ह कार्स मागविल्या आहेत. ही वाहने बुलेटप्रूफ असणार असून त्यांचा वापर विदेशी अतिथींकरता केला जाणार आहे. सीआरपीएफच्या 450 जवानांना या कार्स चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. केंद्र सरकारने 41 विदेशी अतिथींसाठी 60 हून अधिक लेफ्ट हँड ड्राइव्ह कार्स खरेदी किंवा भाडेतत्वावर मिळविल्या आहेत. यात ऑडी, मर्सिडीज आणि बीएमडब्ल्यू यासारख्या आलिशान कंपन्यांची वाहने सामील आहेत. भारतात राइट हँड ड्राइव्ह गाड्या चालविण्याचा प्रोटोकॉल आहे. यात स्टीयरिंग वाहनाच्या उजव्या बाजूला असते. अमेरिकेसह अनेक देशांमध्ये लेफ्ट हँड ड्राइव्ह गाड्या चालविल्या जातात.
सीआरपीएफकडे विशेष जबाबदारी
जी-20 परिषदेच्या अतिथींना सुरक्षा पुरविण्यासाठी या चालकांसमवेत सीआरपीएफचे एकूण 900 जवान तैनात करण्यात आले ओत. यातील काही जवान पूर्वीच स्पेशल प्रोटेक्शन ग्रूप आणि नॅशनल सिक्युरिटी गार्डमध्ये कार्यरत राहिले आहेत. विदेशी अतिथींच्या कुटुंबीयांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी सशस्त्र सीमा दलाच्या कमांडोंना तैनात करण्यात आले आहे. आयटीबीपी, सीआयएसएफ आणि एनएसजीच्या ब्लॅक कॅट कमोंडांना मार्ग अन् परिषद स्थळाच्या सुरक्षेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. याकरता ते दिल्ली पोलिसांसोबत मिळून काम करणार आहेत.









