वार्ताहर /हिंडलगा
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने व लोककल्याण आरोग्य केंद्र मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने हिंडलगा येथील छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकातील श्री महालक्ष्मी मंदिरात आरोग्य चिकित्सा व नेत्रतपासणी, चष्मा व औषधे वाटप शिबिर बुधवार दि. 21 रोजी पार पडले. या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी माजी आमदार मनोहर किणेकर, शिवसेना नेते प्रकाश शिरोळकर, कृषी पत्तीनचे चेअरमन रमाकांत पावशे, ग्रा. पं. सदस्य यल्लाप्पा काकतकर, बबिता कोकितकर, माजी अध्यक्ष प्रकाश महागावकर उपस्थित होते.
प्रथम ग्रा. पं. सदस्य रामचंद्र कुद्रेमनीकर यांनी प्रास्ताविक भाषण करून म. ए. समितीचे कार्यकर्ते नागेश किल्लेकर, भाऊराव कुडचीकर, विनायक किल्लेकर यांच्याहस्ते गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. माजी आमदार मनोहर किणेकर यांच्या हस्ते श्री महालक्ष्मी मूर्तीचे पूजन करण्यात आले व प्रकाश शिरोळकर यांच्याहस्ते श्रीफळ फोडून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी या शिबिराला शुभेच्छा दिल्या. हे शिबिर सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत भरविण्यात आले. यावेळी शिबिरार्थींची आरोग्य चिकित्सा व नेत्रतपासणी करून चष्मा व औषधे देण्यात आली. शिबिर यशस्वी करण्यासाठी श्रीकांत जाधव, मुकुंद कंग्राळकर, अनंत कडोलकर यांनी परिश्रम घेतले. शिबिराला ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिला.









