शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार : विद्यार्थ्यांवर मानसिक दडपण : पालकांमधून तीव्र प्रतिक्रिया
बेळगाव : सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडलेली पाचवी व आठवीची बोर्ड परीक्षा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मंगळवारी झालेल्या द्वितीय भाषा कन्नड प्रश्नपत्रिकेत अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर प्रश्न समाविष्ट करण्यात आल्याने विद्यार्थ्यांची द्विधा मनस्थिती झाली. प्रश्नच समजत नसल्याने न लिहिताच विद्यार्थी घरी परतले. यामुळे शिक्षण विभागातील भोंगळ कारभाराचा फटका विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला होत असल्याची तक्रार पालकांनी केली आहे. बोर्ड परीक्षेचे नियोजन करण्यात राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. शैक्षणिक वर्षाच्या अंतिम टप्प्यात जाहीर झालेली परीक्षा यामुळे बराच गोंधळ उडाला. मॉडेल प्रश्नपत्रिका शिक्षण विभागाने जाहीर केली खरी. परंतु ती केवळ कन्नड माध्यमासाठी होती. इंग्रजी, उर्दू व मराठी माध्यमातील शिक्षकांनी ती रुपांतरित करत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविली. इंग्रजी शाळांना पीडीएफ स्वरुपात प्रश्नपत्रिका देण्यात आली. पालकांनी आपल्याला शक्य तेथून प्रिंट काढत परीक्षेचा अभ्यास सुरू ठेवला.
द्वितीय भाषा कन्नड पेपरमध्ये अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर प्रश्न
सोमवारपासून परीक्षा सुरू झाली. परंतु पुन्हा एकदा ही परीक्षा वादात सापडली आहे. इंग्रजी माध्यमाचा पाचवीचा द्वितीय भाषा कन्नड पेपर मंगळवारी पार पडला. वर्षभर शिकविलेल्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर प्रश्न प्रश्नपत्रिकेत समाविष्ट करण्यात आले होते. यामुळे गोंधळलेल्या विद्यार्थ्यांनी उत्तरे न लिहिता घरी जाणे पसंत केले. अनेकांना तर प्रश्नच समजले नसल्याने पालकांमधून संताप व्यक्त होत आहे. प्रश्नपत्रिका अभ्यासक्रमाबाहेरील असल्याने विद्यार्थ्यांवर दडपण आले असून, याला जबाबदार कोण? असा प्रश्न पालकांमधून विचारला जात आहे. सर्वच इंग्रजी माध्यमाच्या शालेय विद्यार्थ्यांमधून ही प्रतिक्रिया व्यक्त होत होती. परीक्षेचे नियोजन करताना अभ्यासक्रमाव्यतिरिक्त प्रश्न विचारले जाणार नाहीत, असे नमूद करूनही प्रश्नपत्रिका मात्र अभ्यासक्रमाव्यतिरिक्त काढण्यात आली. किमान विद्यार्थ्यांचा विचार करून तरी शिक्षण विभागाने प्रश्नपत्रिका काढणे आवश्यक होते. या घडलेल्या सर्व प्रकारामुळे विद्यार्थी व पालकांमधून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.









