कोल्हापूर / विनोद सावंत :
गॅस सिलिंडर घरपोहोच देणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून वरकमाईचा सपाटा लावला जात आहे. सिलिंडरची किंमत 806 रुपये असताना ग्राहकांकडून 820 रुपये घेतले जात आहेत. त्यांच्याकडून एका सिलिंडरमागे 14 रुपयांची वरकमाई केली जात आहे. यासंदर्भात वितरक, जिल्हा पुरवठा विभाग हातवर करत असून अशा घरपोहोच गॅस पुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर वेसन कोण घालणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
15 ते 20 वर्षांपूर्वी प्रत्येकांच्या घरामध्ये असणारी चुल आता कालबाह्या झाली आहे. सर्वच ठिकाणी एलपीजी गॅसवरच स्वयंपाक केला जातो. जिल्ह्यात गॅस सिलिंडरपुरवठा करण्यासाठी गॅस कंपनींनी वितरकांची नेमणूक केली असून घरपोहोच सिलिंडर देण्याची सुविधा आहे. दर महिन्याला गॅस सिलिंडरचे दर निश्चित होतात. परंतू घरपोहोच सिलिंडर देणारे काही कर्मचारी ग्राहकांकडून सिलिंडरच्या रकमेपेक्षा जादा पैसे घेत आहेत. याबाबत त्यांना विचारले असता ‘जिन्यावर चढून येऊन गॅस देतो’, ‘घरपोहोच सेवा म्हणून अतिरिक्त चार्ज’, अशी उत्तरे दिली जातात. वास्तविक पावतीवरील दर हा घरपोहोच सहज असतो. परंतू त्यांच्याकडून ग्राहकांची दिशाभूल केली जाते. गरज असल्याने ग्राहक त्यांच्याशी वाद घालण्याच्या भानगडीत पडत नाहीत.
- रोजची हजारोंची ‘कमाई’
काही कर्मचाऱ्यांकडून सुट्टे पैसे परत दिले जातच नाहीत. तर काही कर्मचारी 806 रुपयांच्या गॅससाठी 820 रुपये घेतात. तसेच व्यावसायिक वापारासाठी घरगुती सिलिंडर दिला जातो. यातून रोज ते हजारो रुपयांची कमाई करतात. यासंदर्भात वितरण कंपनी, जिल्हा पुरवठा विभागाकडून कोणतीच कार्यवाही होता नाही, हे विशेष आहे.
- ऑनलाईन सिस्टीम असूनही गोलमोल
घरगुती सिलिंडर हॉटेल व्यावसायिक, फेरीवाल्यांना जादा दराने दिले जात असल्याचे अनेकवेळा समोर आले आहे. यावर प्रशासनाने अंकुश आणण्यासाठी उपाययोजना केल्या. गॅसपुरवठ्याची सर्व सिस्टीम ऑनलाईन केली. यातूनही पळवाट करत कर्मचाऱ्यांकडून गोलमोल सुरूच आहे.
- मग पावत्यांचे होते काय?
गॅस वितरण कंपनीमधून ग्राहकांनी बुकींग केल्यानंतर पावत्याचे प्रिटींग होते. कंपनी रूटप्रमाणे संबंधित कर्मचाऱ्यांकडे त्या दिल्या जातात. परंतू कर्मचारी ग्राहकांना केवळ सिलिंडर देतात. पावतीवर गॅसची रक्कम असल्याने मागणी करणाऱ्यांनाच पावती दिली जाते.
- मोबाईलवर गॅस दराचे संदेश तरीही धाडस
गॅस ग्राहकांना बुकींग झाल्याचे तसेच गॅससाठी किती रुपये द्यावे याचा संदेशही मोबाईलवर येतो. तरीही वितरण कंपनीचे कर्मचारी जादाची रक्कम घेण्याचे धाडस करत आहेत.
- थेट गॅसपाईपलाईनचा पर्याय
सध्या एका कंपनीकडून कोल्हापुरात थेट गॅसपाईपलाईनने गॅसपुरवठा होत आहे. शहरातील 40 टक्के परिसरात गॅसपाईपलाईन टाकून झाली आहे. यामध्ये जेवढा गॅस वापरणार तेवढेच कंपनीला बील द्यावे लागते. सिलिंडरसाठी नंबर लावण्याची कटकट नाही. टाकी घरपोहोच येण्याची प्रतीक्षा करणे किंवा जादा पैसे देण्याचा विषयच नाही. त्यामुळे थेट गॅस पाईपलाईन हा चांगला पर्याय आहे.
गॅस वितरकांनी ग्राहकांना गॅस सिलिंडरची पावती देणे क्रमप्राप्त आहे. घरी गॅस आल्यानंतर ग्राहकांनीही पावती पाहून त्यावर जितकी रक्कम असेल तेवढीच रक्कम कर्मचाऱ्यास दिली पाहिजे. जादा रक्कम देणे टाळले पाहिजे.
मोहिनी चव्हाण, जिल्हा पुरवठा अधिकारी
जिल्ह्यात गॅस कनेक्शनधारक – 8 लाख 13 हजार
व्यावसायिक सिलिंडरधारक – 13 हजार
वितरक – 250
वितरण कर्मचारी – सुमारे 1 हजार








