सलग सुटय़ांमुळे प्रवाशांच्या संख्येत वाढ
प्रतिनिधी /बेळगाव
शिवजयंती, बसवजयंती आणि रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर विविध शहरांकडे जादा बस सोडण्यात आल्या आहेत. प्रवाशांच्या सोयीखातर परिवहनने हा निर्णय घेतला आहे. सलग सुटय़ा असल्यामुळे ये-जा करणाऱयांची संख्या अधिक असते. त्यामुळे विविध शहरांकडे अतिरिक्त बस सोडण्यात आल्या आहेत.
रविवारी साप्ताहिक सुटी, सोमवारी शिवजयंती आणि मंगळवारी बसवजयंती व रमजान ईदच्या सुटीमुळे लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱयांची संख्या अधिक असते. दरम्यान प्रवाशांची गैरसोय होऊ नये, याकरिता परिवहनमार्फत मुंबई, पुणे, म्हैसूर, बेंगळूर आदी शहरांकडे जादा बस सोडण्यात आल्या आहेत. कोरोनामुळे मागील दोन वर्षांत परिवहनला प्रचंड फटका बसला आहे. झालेले नुकसान भरून काढण्यासाठी परिवहनचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. शिवाय सणा-सुदीच्या दिवसांत अतिरिक्त बस पुरवून महसूल वाढविण्यासाठी परिवहन प्रयत्नशील आहे.
परिवहनला दिलासा
सलग तीन दिवस सुटी असल्यामुळे मूळ गावी परतणाऱया प्रवाशांची संख्या अधिक असते. याची दखल घेवून परिवहनने जादा बस सोडल्या आहेत. याबरोबरच रात्रीच्या प्रवासासाठी वातानुकूलित बसची व्यवस्था केली आहे. त्यामुळे प्रवास सुखकर झाला आहे. तीन दिवसांत विविध ठिकाणी अतिरिक्त बस धावल्याने महसुलातही काही प्रमाणात वाढ झाली आहे.









