मुंबई, पुणे, बेंगळूर मार्गांवर अतिरिक्त बससेवा : प्रवाशांना अतिरिक्त बस ठरल्या सोयीच्या
प्रतिनिधी /बेळगाव
परिवहन मंडळाने प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी अतिरिक्त बससेवा सुरू केली आहे. ही अतिरिक्त बससेवा 10 ऑक्टोबरपर्यंत विविध मार्गांवर धावणार आहे. दसऱयाची सुट्टी संपवून परतीचा प्रवास करणाऱया प्रवाशांची संख्या वाढली आहे. यासाठी ही जादा बससेवा 10 ऑक्टोबरपर्यंत पुरविली जाणार आहे.
मागील आठवडय़ापासून परिवहनने विविध मार्गांवर जादा बस सोडल्या आहेत. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मुंबई, पुणे, बेंगळूर, मंगळूर, हैद्राबाद मार्गांवर जादा बस धावत आहेत. मागील रविवारी 2 ऑक्टोबरपासून या बससेवेला प्रवाशांचा प्रतिसाद मिळाला होता. दरम्यान, शनिवारी-रविवारी सुट्टी असल्याने माघारी परतणाऱयांची संख्या वाढली होती. अशा प्रवाशांना या अतिरिक्त बस सोयीस्कर ठरल्या आहेत. दसऱयाची सुट्टी संपवून मुंबई, बेंगळूर, पुणे आणि गोव्याकडे परतणाऱया प्रवाशांची संख्या वाढली आहे. अशा प्रवाशांना जादा बस सोयीस्कर ठरत आहेत.
अधिक उत्पन्नाची अपेक्षा
परिवहनने नवरात्रोत्सव काळात सौंदत्ती यल्लम्मा यात्रेसाठी अतिरिक्त बससेवा पुरविली होती. दरम्यान, दसऱयाच्या सुट्टीसाठी लांब पल्ल्यांहून येणाऱया प्रवाशांची संख्या अधिक असते. यासाठी विविध मार्गांवर जादा बससेवा पुरविण्यात आली होती. मात्र, शनिवार, रविवारी सुट्टी असल्याने ही बससेवा 10 ऑक्टोबरपर्यंत सुरू ठेवण्यात आली आहे. त्यामुळे लांबचा प्रवास करणाऱया प्रवाशांची सोय होणार आहे. सौंदत्ती यल्लम्मा यात्रेतून 53 लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. त्याचबरोबर विविध मार्गांवर सोडलेल्या जादा बसमधूनही अधिक उत्पन्न प्राप्त होईल, अशी अपेक्षा परिवहनला आहे.









