भरवस्तीतील प्रकाराने पसरली घबराट
पाली : वार्ताहर
तालुक्यातील पाली येथे मोबाईलचे दुकान फोडून 2 लाख 36 हजार 740 रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना 19 ते 20 ऑक्टोबर या दरम्यान घडली. यामुळे आता चोरट्यांनी आपला मोर्चा निमशहरी भागाकडे वळवल्याची भीती व्यक्त होत आहे.
या बाबतची फिर्याद कल्पेश खोचाडे (30, साठरेबांबर) यांनी पाली पोलीस दूरक्षेत्रात दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्पेश खोचाडे यांचे पाली बाजारपेठेत रेडजाई मोबाईल हे मोबाईल विक्री व दुरुस्तीचे दुकान आहे. ते मंगळवार 19 ऑक्टोबर रोजी दुकान बंद करुन घरी गेले होते. 20 ऑक्टोबर रोजी सकाळी 9.30 च्या सुमारास दुकानात आले असता दुकान फोडल्याचे दिसून आले. गाळ्याचे लोखंडी शटर मध्यभागी उचकटून दुकानात प्रवेश करत अज्ञात चोरट्याने दुकानातील 2 लाख 16 हजार रुपये किंमतीचे रेडमी, व्हिवो, सॅमसंग, आयटेल, लाव्हा, नोकिया कंपनीचे 37 मोबाईल, 17 हजार रुपये किंमतीची 8 घड्याळे, 3200 रुपये किंमतीचा रियलमी इयरबर्डस असा एकूण 2 लाख 36 हजार 740 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
पोलीस तपासात श्वानपथकाने केवळ 100 मीटरपर्यंत माग काढला. ठसेतज्ञांनीही घटनास्थळी भेट दिली. वरील मजल्यावर माणसे झोपलेली, ऐन वस्तीत व रात्री उशिरापर्यंत महामार्गाचे काम सुरू असूनही ही चोरी केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. लगतच्या एका दुकानाच्या सीसीटीव्हीमध्ये चोरटा जाताना व येताना चित्रित झाला असून त्या दिशेने पोलीस तपास करीत आहेत.
घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर सूर्य, पोलीस उपनिरीक्षक राठोड, पाली पोलीस दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मोहन कांबळे, हेडकॉन्स्टेबल संतोष कांबळे, पोलीस नाईक राकेश तटकरी यांनी भेट देऊन पंचनामा केला. कल्पेश खोचाडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अज्ञातावर भादंविकलम 454, 457. 380 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.