अवैध नाक्यांमुळे त्रस्त टँकर संचालक संपावर : 90 टक्के पेट्रोल पंपांमधील इंधनसाठा संपुष्टात
वृत्तसंस्था/ इंफाळ
मणिपूरमध्ये 167 दिवसांपासून हिंसा सुरू असून राज्यातील 90 टक्के पेट्रोल पंपांमधील इंधनसाठा आता संपुष्टात आला आहे. तसेच गॅस सिलिंडरचा साठाही जवळपास संपत आला आहे. पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी पंपचालकांच्या संपामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. पूर्ण राज्यात इंधनाचे टँकर धावत नसल्याचे चित्र आहे. राज्याच्या महामार्गावर उग्रवादी संघटनांनी स्वत:चे नाके उभारून प्रत्येक टँकरकडून 5-15 हजार रुपयांपर्यंतची खंडणी वसूल करण्याचे सत्र आरंभिले आहे. खंडणी न दिल्यास टँकर पेटविण्याचा आणि चालकाला जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे.
पेट्रोल पंप संचालकांनी मागील आठवड्यात हा मुद्दा सरकारसमोर उपस्थित केला होता. टँकर पोलिसांच्या संरक्षणात धावतील असे आश्वासन राज्याचे सुरक्षा सल्लागार कुलदीप सिंह यांनी दिले होते, परंतु हे घडले नाही. यामुळे टँकर संचालक संपावर गेले आहेत. सद्यस्थितीत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 37 वर कित्येक टँकर उभे असून त्यांचे चालक अन्यत्र गेले आहेत. संपानंतरही अनेक ठिकाणी काळ्या बाजारात पेट्रोल सुमारे 150 रुपये प्रतिलिटरमध्ये उपलब्ध होत असल्याचेही वृत्त आहे.
पेट्रोलपंपांवर लांबच लांब रांगा
मणिपूरमध्ये पेट्रोल-डिझेलचा साठा जवळपास शून्य होणार आहे. याचमुळे अनेक पेट्रोलपंप संचालक त्याचे रेशनिंग देखील करत आहेत. पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा दिसून येत आहेत. शासकीय वाहनांसाठी देखील फारच कमी प्रमाणात इंधनसाठा शिल्लक राहिला आहे. हा इंधनसाठा एक किंवा दोन दिवसांत संपणार आहे. स्थिती बिघडू नये म्हणून वितरकांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे हस्तक्षेपाची मागणी केली आहे.
उग्रवाद्यांकडून गोळीबार अन् मारहाण
काही टँकरचालकांवर इम्फाळ-जिरीबाम मार्गावर हल्ला झाला. उग्रवाद्यांनी प्रथम शुल्काच्या नावावर हजारो रुपये काढून घेतले, मग पैसे दिल्यावरही चालकांना मारहाण करण्यात आली तसेच टँकर्सवर गोळीबार करण्यात आला.
मणिपूर हिंसेचे 180 बळी
मणिपूरमध्ये मागील 4 महिन्यांपासून सुरू असलेल्या हिंसेत आतापर्यंत 180 जण मारले गेले आहेत. तर 1100 हून अधिक जण जखमी झाले आहेत. याचबरोबर राज्यात जाळपोळीच्या 5172 घटना घडल्या असून यात 4786 घरांना तर 386 धार्मिक स्थळांना पेटवून देण्याच्या घटना सामील आहेत.









