दहाव्या संयुक्त आयोगाच्या बैठकीला उपस्थित राहणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर बुधवारी टांझानियाच्या चार दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर रवाना झाले. परराष्ट्रमंत्र्यांचा टांझानिया दौरा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. या दौऱ्यादरम्यान ते टांझानियन पररारष्ट्रमंत्र्यांशी उच्चस्तरीय चर्चा करतील. तसेच दहाव्या संयुक्त आयोगाच्या बैठकीचे सह-अध्यक्ष म्हणूनही महत्त्वाची भूमिका बजावतील.
आपल्या दौऱ्यात परराष्ट्रमंत्री जयशंकर पूर्व आफ्रिकन देशाच्या सर्वोच्च नेतृत्वाची भेट घेतील आणि भारतीय नौदल जहाज ‘त्रिशूल’च्या स्वागत समारंभाला उपस्थित राहतील. यासोबतच ते भारतीय समुदायाच्या लोकांना संबोधित करतील. तसेच स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याचे उद्घाटन करतील.
आफ्रिकन राष्ट्रांच्या चार दिवसांच्या दौऱ्यात जयशंकर प्रथम 5 ते 6 जुलै दरम्यान झांझिबारला भेट देणार असून तेथे भारत सरकारच्या व्रेडिट लाईनद्वारे निधी असलेल्या पाणीपुरवठा प्रकल्पाला भेट देतील. तसेच तेथे सर्वोच्च नेतृत्वाचीही भेट घेणार आहे. त्यानंतर 7-8 जुलै 2023 या कालावधीत टांझानियातील दार-एस-सलाम शहराला भेट देत अनेक पॅबिनेट मंत्र्यांसह देशातील सर्वोच्च नेतृत्वाला भेटतील.









