द्विपक्षीय संबंध सुधारण्यावर भर : उपराष्ट्रपती,
वृत्तसंस्था/ बीजिंग
भारतीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर पाच वर्षांनंतर चीनच्या दौऱ्यावर पोहोचले असून सोमवारी त्यांनी बीजिंगमध्ये चीनचे उपराष्ट्रपती हान झेंग यांची भेट घेतली. या दरम्यान त्यांनी भारत-चीन संबंध सुधारण्याबद्दल चर्चा केली. या भेटीमुळे हे संबंध आणखी सुधारतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे. 2020 मध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर दोन्ही देशांमधील तणाव शिगेला पोहोचला होता, परंतु आता मंत्रीस्तरीय वाढत्या चर्चांमुळे नवीन आशा निर्माण होत आहेत.
जयशंकर चीनच्या तियानजिन शहरात मंगळवार, 15 जुलै रोजी होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) परिषदेत सहभागी होण्यासाठी चीनला भेट देत आहेत. 2020 मध्ये गलवानमध्ये झालेल्या लष्करी संघर्षानंतर दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये निर्माण झालेल्या तणावानंतर जयशंकर यांचा हा पहिलाच चीन दौरा आहे. गेल्या काही महिन्यांत भारत आणि चीनने द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत.
चीनचे उपराष्ट्रपती हान झेंग यांनी सोमवारी बीजिंगमध्ये भारतीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान दोन्ही देशांमधील संबंध मजबूत करण्यावर भर दिला. जयशंकर यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान झेंग यांनी भारत-चीन मैत्रीसाठी ‘ड्रॅगन-एलिफंट डान्स’चा वापर केला. हे जगातील दोन सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशांमधील सहकार्य सुधारण्याची बीजिंगची इच्छा दर्शवते. हान झेंग यांनी दोन्ही बाजूंना उच्चस्तरीय सहकार्य राखण्यास आणि एकमेकांच्या चिंतांची काळजी घेण्यास सांगितले. एस जयशंकर यांनी चीनशी चांगले संबंध ठेवण्याचे महत्त्व देखील अधोरेखित केले आहे.
जयशंकर यांच्याशी झालेल्या भेटीत झेंग यांनी 2023 मध्ये कझानमध्ये चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील भेटीचा उल्लेख केला. ‘कझानमधील बैठक एक निर्णायक क्षण असल्यामुळे चीन-भारत संबंध पुन्हा सुरू होण्यास मदत झाली. चीन आणि भारताने एकमेकांच्या यशात सहाय्यक भागीदार बनले पाहिजे. या सहकार्यावर पुढे जाण्यासाठी, ‘ड्रॅगन-एलिफंट डान्स’ हा पुढे जाण्याचा योग्य मार्ग असल्याचे जयशंकर यांनी स्पष्ट केले.
भारत-चीन संबंध सामान्य राहिल्यास भविष्यात चांगले परिणाम दिसतील. गुंतागुंतीची जागतिक परिस्थिती पाहता, दोन्ही शेजारी देशांमधील विचारांची खुली देवाण-घेवाण महत्त्वाची आहे. या भेटीबद्दलची माझी चर्चा सकारात्मक दिशेने जाईल, असेही ते पुढे म्हणाले. दोन्ही बाजूंकडून मिळालेल्या सकारात्मक विधानांमुळे तणावपूर्ण भारत-चीन संबंधात सुधारणा अपेक्षित आहे.
‘एससीओ’साठी पाठिंबा
बीजिंगला पोहोचल्यानंतर लगेचच डॉ. एस जयशंकर यांनी चीनचे उपराष्ट्रपती हान झेंग यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला. झेंग यांना भेटून मला खूप आनंद झाला असे नमूद करतानाच चीनच्या एससीओ अध्यक्षपदासाठी मी त्यांना भारताचा पाठिंबा व्यक्त केला आहे. माझ्या भेटीदरम्यान होणाऱ्या चर्चा दोन्ही देशांसाठी सकारात्मक असतील असा विश्वासही व्यक्त केला आहे.









