वाकरे / प्रा.एस.पी.चौगले :
हंगामपूर्व वळीव पावसामुळे करवीर तालुक्यात रब्बी हंगामातील भुईमूग, भात,मका आणि सूर्यफुलांची पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रब्बी हंगामातील 99 हेक्टरमधील भुईमूग, भात आणि सूर्यफुलाची काढणी थांबली असून खरिपाच्या 11970 हेक्टर क्षेत्रामधील पेरण्या खोळंबल्या आहेत.दरम्यान नुकसानग्रस्त शेतक्रयांना शासनाने त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
करवीर तालुक्याच्या पश्चिम भागात मुख्य पीक ऊस असून बदली पीक म्हणून रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात उन्हाळी भात,भुईमूग,मका आणि सूर्यफुलाचे उत्पादन घेतले जाते. परिसरातील शेतकरी पीक फेरपालट म्हणून ब्रयाचदा भुईमूग आणि सूर्यफुलाचे उत्पादन घेतात. तसेच लागण आणि खोडवा उसामध्ये मका पिकाचे उत्पादन घेतले जाते. साधारण मे महिन्यात ही सर्व पिके काढणीस येतात. सध्या या परिसरात भुईमूग काढणे, सूर्यफूल तोडणी, मका आणि उन्हाळी भात कापणीच्या कामास वेग आला होता. पण गेल्या पंधरा दिवसापासून वळीव पावसाच्या वातावरणामुळे शेतकरी वर्ग ढगाळ वातावरण दूर होऊन उन्हाच्या प्रतीक्षेत होता. मात्र गेल्या चार दिवसापासून पेरणीपूर्व हंगामातच मुसळधार पावसाने सुरुवात केल्याने शेतक्रयांचे अंदाज फोल ठरले आहेत. सध्या कापणीस आलेले भात शेतात कुजू लागले असून भुईमूग आणि मक्याला मोड आले आहेत. सूर्यफुलाच्या बियांना सुद्धा मोड आले असून हातातोंडाशी आलेली ही पिके खराब झाली आहेत. गेल्या चार महिन्यात शेतक्रयांनी या पिकांवर हजारो रुपयांचा खर्च केला होता ,मात्र ही पिके पक्व झाल्यानंतर पावसाने सुरुवात केल्यामुळे ही पिके आता शेतक्रयांच्या हाताला लागणार नाहीत. त्यामुळे या अवकाळी पावसाने शेतक्रयाला मोठा फटका दिला आहे.
आता खरिपाच्या मशागतीची कामे थांबली असून शेतात पाणी तुंबल्याने मशागत कशी करायची असा प्रश्न शेतक्रयांसमोर उभा राहिला आहे. शासनाने या सर्व पिकांची तातडीने पंचनामे करून शेतक्रयांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.
- करवीर तालुक्यातील उन्हाळी पिकाची आकडेवारी–
1)भुईमूग 163 हेक्टर (काढणीविना क्षेत्र 40 हेक्टर )
2)भात 30 हेक्टर (कापणीविना क्षेत्र 24 हेक्टर)
3)सूर्यफूल 116 हेक्टर (काढणीविना क्षेत्र 35 हेक्टर)
- खरीप पिकाची पेरणी खोळंबलेले क्षेत्र–
1)भात 4400 हेक्टर
2)भुईमूग 2700 हेक्टर
3)सोयाबीन 4420 हेक्टर
4)नाचणी 450 हेक्टर
एकूण 11970 हेक्टर
- खते, बी बियाणे मुबलक–
करवीर तालुका कृषी अधिकारी युवराज पाटील यांनी तालुक्यात खते आणि बी बियाणे मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध असल्याचे सांगून शेतक्रयांनी पाऊस व हवामानाचा अंदाज पाहून पेरणी करावी असे आवाहन केले आहे.








