वडूज :
खटाव (वडूज) पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्याला पाच हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कार्यालयातच रंगेहाथ पकडले. प्रधानमंत्री आवास योजनेचे हप्ते मंजूर करून घेण्यासाठी ही मागणी करण्यात आली होती. या कारवाईमुळे पंचायत समितीच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.
शरण देवीसिंग पावरा (वय ४३) विस्तार धिकारी वर्ग ३ मूळ रा. आंबापूर ता. शहादा जिल्हा नंदुरबार सध्या रा. डंगारे पेट्रोल पंप शेजारी शिवाजीनगर दहिवडी असे संबंधित विस्तार अधिकाऱ्याचे नाव आहे.
तक्रारदार यांच्या पत्नीच्या नावे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत २०२४-२५ साठी घरकुल मंजूर झाले होते. या घरकुलाचा हप्ता आरोपी लोकसेवक शरण पावरा याने ७० हजार रुपये मंजूर करून दिला. तसेच त्यानंतरचे हप्ते मंजूर करण्यासाठी त्यांनी दहा हजार रुपयांची लाच मागितली पहिला हप्ता पाच हजार रुपये आणि उर्वरित पाच हजार रुपये पुढील आठवड्यात देण्याचे ठरले होते. तक्रारदाराने या संदर्भात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक राजेश वाघमारे यांच्याकडे लेखी तक्रार दिली. त्या तक्रारीनुसार पोलीस निरीक्षक सचिन राऊत, गणेश ताटे, निलेश राजपुरे, सत्यम थोरात, श्री. देशमुख यांनी खटाव पंचायत समितीच्या आवारात सापळा रचला आणि पावरा याला लाच घेताना रंगेहाथ पकडले. त्याच्या विरोधात वडूज पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद नोंदवण्यात आली आहे.








