दक्षिण सोलापूर पंचायत समितीत एसीबीचा सापळा
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील पंचायत समिती, दक्षिण सोलापूर येथे भ्रष्टाचाराविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुन्हा एकदा प्रभावी कारवाई करत विस्तार अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडले आहे. दोन हजार रुपयांची लाचेची मागणी आणि स्वीकार यामुळे अधिकारी ‘एसीबी ‘च्या जाळ्यात रंगेहात अडकला आहे.
प्राप्त माहितीनुसार, दक्षिण सोलापूर तालुक्यातील मौजे येळेगाव येथे १५ वा वित्त आयोग योजनेअंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम करण्यात आले होते. त्या कामाचे बील मंजूर करून रक्कम ग्रामपंचायत बँक खात्यातून काढण्यासाठी विस्तार अधिकारी संदीप सुधाकर खरबस (पदः पंचायत विस्तार अधिकारी, दक्षिण सोलापूर) यांनी तक्रारदाराकडे दोन हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती.
तक्रारदाराने हा प्रकार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर येथे नोंदविला. उपअधीक्षकांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक शैलेश पवार यांच्या पथकाने पडताळणी कारवाई केली असता, खरबस यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. यानंतर गुरुवार (दि. ३०) जिल्हा परिषद कार्यालय, सोलापूर येथे कारवाईदरम्यान रचलेल्या खरबस सापळा यांनी तक्रारदाराकडून दोन हजार रुपये स्वीकारताच पथकाने त्यांना रंगेहात पकडले. याप्रकरणी सदर बझार पोलीस ठाणे येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
लाचलुचपत विभागाचे आवाहन
शासकीय कामासाठी कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी लाचेची मागणी करत असल्यास तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन लाच लचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत चौगुले यांनी केले आहे.








