15 जूनपर्यंत करता येणार प्रवास : विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी परिवहनचा निर्णय
प्रतिनिधी / बेळगाव
विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी जुन्या बसपासची मुदत 15 जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना जुना बसपास आणि शाळा प्रवेशशुल्क पावती दाखवून प्रवास करता येणार आहे. नवीन ऑनलाईन बसपास प्रक्रिया सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांकडून अर्ज स्वीकारले जात आहेत. मात्र, नवीन बसपास उपलब्ध होईपर्यंत म्हणजेच 15 जूनपर्यंत जुन्या बसपासच्या आधारे प्रवास करता येणार आहे.दरवर्षी शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाला की बसपास प्रक्रियेला प्रारंभ होतो. मागील दोन वर्षात कोरोनामुळे बसपास वितरण प्रक्रिया विस्कळीत झाली होती. मात्र, यंदा या प्रक्रियेला सुरळीत सुरुवात झाली आहे. बसपाससाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. विशेषत: ग्राम वन व कर्नाटक वनमध्येही ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना गावातच बसपास उपलब्ध होणार आहेत.
बेळगाव विभागातील चार आगारांसह बैलहोंगल, खानापूर व रामदुर्ग या आगारांतून 76 हजारांहून अधिक विद्यार्थी बसपास घेतात. मात्र, बसपासची प्रक्रिया पूर्णपणे बदलली आहे. बसपाससाठी आता ऑनलाईन अर्ज दाखल करावा लागत आहे. शैक्षणिक वर्षाला 29 मेपासून प्रारंभ झाला आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांकडे नवीन बसपास उपलब्ध नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक फटका बसू शकतो. याची दखल घेत परिवहनने 15 जूनपर्यंत जुन्या बसपासची मुदत वाढविली आहे. या काळात विद्यार्थ्यांना जुन्या बसपासच्या आधारे प्रवास करता येणार आहे. यंदा बसपास वितरण प्रक्रियेत काहीसा बदल करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना ग्राम वन व कर्नाटक वनमध्ये बसपास उपलब्ध करून दिले जाणार आहेत. यासाठी प्रथमत: ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. त्यानंतर अर्ज केलेला अर्ज परिवहनच्या बसपास विभागात जाणार आहे. त्या ठिकाणी मंजुरी मिळाल्यानंतर ग्राम वन व कर्नाटक वनमधून बसपास वितरित केला जाणार आहे.









