पुणे / प्रतिनिधी :
सरकारी सेवेत नियुक्ती होताना अनाथ प्रवर्गातील उमेदवारांना टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी दोन संधी तसेच दोन वर्षे इतकी मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. (Extension of two years for passing the typing test) त्यासंदर्भातील अध्यादेश महिला व बाल विकास विभागाने नुकताच काढला आहे.
शासन सेवेत ज्या पदाच्या सेवा प्रवेश नियमांमध्ये टंकलेखनाची परीक्षा (इंग्रजी/मराठी) उत्तीर्ण होण्याची अट असेल, अशा पदांवर अनाथ उमेदवारांना नियुक्ती मिळाल्यास त्यांना टंकलेखनाची (इंग्रजी/मराठी) परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी अवधी व संधी देण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे. महिला व बाल विकास विभागाकडून अनाथांसाठीचे सुधारित धोरण तयार करण्यात आले आहे. त्यात अनाथांना शिक्षण व नोकरी यामध्ये एकूण पदांच्या एक टक्के आरक्षण देण्यात आले आहे.
हेही वाचा : काय ती स्मार्ट सिटी, काय तो कोट्यवधींचा घोटाळा…
अनाथ प्रवर्गाच्या आरक्षणासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी निश्चित केलेले वय, शैक्षणिक शुल्क, परीक्षा शुल्क, किमान गुणवत्ता पात्रता असे निकष लागू करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे अनाथांच्या आरक्षणाचे अल्प प्रमाण तसेच त्यांना नोकरीच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने सहानुभूतिपूर्वक विचार करून, अनाथांना माजी सैनिक व दिव्यांगाच्या धर्तीवर मराठी / इंग्रजी टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी काही अवधी व संधी देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे, असे महिला व बाल विकास विभागाचे कक्ष अधिकारी ख. फा. नाईकवाडे यांनी अध्यादेशात नमूद केले आहे.