पुणे / प्रतिनिधी :
राज्य मंडळातर्फे जुलै-ऑगस्टमध्ये होणाऱ्या दहावी पुरवणी परीक्षेसाठी नियमित शुल्कासह अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली असून, विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह 21 जूनपर्यंत, तर विलंब शुल्कासह 25 जूनपर्यंत अर्ज करता येईल.
राज्य शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. दहावी पुरवणी परीक्षेला पुनर्परीक्षार्थी, या पूर्वी नाव नोंदणी प्रमाणपत्र झालेले खासागी विद्यार्थी, तसेच श्रेणी सुधार योजनेअंतर्गत आणि तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील श्रेयांक हस्तांतरण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने शाळांमार्फत अर्ज भरता येणार आहे.
अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आल्याने नियमित शुल्कासह 21 जूनपर्यंत, तर विलंब शुल्कासह 22 ते 25 जून या कालावधीत अर्ज भरता येईल. तसेच माध्यमिक शाळांनी विद्यार्थ्यांचे शुल्क 26 जूनपर्यंत भरणे आवश्यक आहे. त्यानंतर 27 जूनपर्यंत शाळांनी विद्यार्थ्यांच्या याद्या विभागीय मंडळाने जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.








