विधी आयोगाने अंतिम मुदत 28 जुलैपर्यंत वाढवली
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
विधी आयोगाने शुक्रवारी देशवासियांना समान नागरी संहितेवर (युसीसी) त्यांचे मत पाठवण्याची अंतिम मुदत 28 जुलैपर्यंत वाढवली. 14 जून रोजी केंद्रीय कायदा आयोगाने देशभरातील संस्था आणि लोकांकडून अभिप्राय मागवले होते. सूचना नोंदवण्यासाठी लोकांना एक महिन्याची मुदत देण्यात आली होती. ही मुदत शुक्रवार, 14 जुलै रोजी संपत असतानाच आणखी 15 दिवसांचा वेळ वाढवून देण्यात आला आहे.
समान नागरी संहितेच्या विषयावर जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि त्यांच्या सूचना सादर करण्यासाठी वेळ वाढविण्यासंदर्भात विविध क्षेत्रांकडून प्राप्त झालेल्या अनेक विनंत्या लक्षात घेऊन विधी आयोगाने मते सादर करण्यासाठी दोन आठवड्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या अधिसूचनेनुसार कोणतीही इच्छुक व्यक्ती, संस्था किंवा संघटना आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर युसीसीवर 28 जुलैपर्यंत सूचना पाठवू शकते.
देशात सर्वधर्मियांसाठी समान नागरी कायदा लागू करण्यासाठी केंद्रीय कायदा आयोगाने चर्चा प्रक्रियेचा प्रारंभ केला आहे. धार्मिक संघटना आणि सर्वसामान्य नागरिकांकडून सूचना मागविण्यात आल्या आहेत. ज्या लोकांना यासंबंधी आपली मते व्यक्त करायची आहेत, त्यांनी कायदा आयोगाशी संपर्क करुन त्यांचे विचार मांडण्याची अनुमती देण्यात आली आहे.









