वृत्तसंस्था /नवी दिल्ली
मणिपूर राज्यात घडलेल्या हिंसाचाराची चौकशी करणाऱ्या आयोगाला केंद्र सरकारकडून पुन्हा कालावधीवाढ देण्यात आली आहे. या आयोगाची स्थापना 4 जून 2023 या दिवशी झाली होती. त्यानंतर आयोगाला एकदा कालावधीवाढ देण्यात आली होती. आता पुन्हा ती देण्यात आली आहे.
या आयोगाचे नेतृत्व गुवाहाटी उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश अजय लांबा करीत आहेत. या आयोगात निवृत्त आयएएस अधिकारी हिमांशू शेखर दास आणि निवृत्त आयपीएस अधिकारी अलोक प्रभाकर या सदस्यांचाही समावेश आहे. मणिपूरमध्ये एक वर्षाहून अधिक काळ दोन प्रमुख समाजघटकांमध्ये संघर्ष होत असून या संघर्षात आजपर्यंत 258 लोकांचा बळी गेला आहे. या राज्यातील मैतेयी आणि कुकी समाजांमध्ये हा संघर्ष होत असून त्यामुळे राज्यात अद्यापही अशांतता आहे. त्यामुळे काही भागांमध्ये पुन्हा विशेष सुरक्षा कायदा (आफ्स्पा) लागू करण्यात आला आहे. तसेच केंद्रीय राखीव सुरक्षा दले नियुक्त झाली आहेत.









