वृत्तसंस्था / मॉस्को
अमेरिका आणि रशिया यांच्यात झालेल्या अण्वस्त्र कपातीच्या कराराला कालावधीवाढ देण्यास रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी मान्यता दर्शविली आहे. अमेरिकाही या कराराला कालावधीवाढ देणार असेल, तर रशियाही तसेच करण्यास सज्ज आहे, असे प्रतिपादन पुतीन यांनी सोमावारी येथे केले आहे.
दोन्ही देशांमध्ये हा करार 2010 मध्ये करण्यात आला होता. या दोन्ही देशांमध्ये शस्त्रनियंत्रणासाठी जे अनेक करार करण्यात आले आहेत. त्यांच्यापैकी सध्या अस्तित्वात असलेला हा एकमेव करार आहे. या करारामुळे अण्वस्त्रे, अण्वस्त्रे वाहून नेणारी क्षेपणास्त्रे आणि अण्वस्त्रे टाकू शकतील अशी क्षमता असणारी विमाने यांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यात आले होते. या कराराला आजवर अनेकदा कालावधीवाढ देण्यात आली आहे. या कराराचा कालावधी 5 फेब्रुवारी 3025 या दिवशी संपत आहे. त्यामुळे त्याला कालावधीवाढ देण्यासंदर्भात पुन्हा चर्चा करण्यात येत आहे. अमेरिकेचे या संबंधी जे धोरण असेल, तेच रशियाचे असेल, अशी भूमिका पुतीन यांनी स्पष्ट केली. या कराराला कालावधीवाढ मिळाल्यास अण्वस्त्रप्रसारबंदीच्या जागतिक तत्वाचे संरक्षण होणार आहे. तथापि, रशिया या संदर्भात स्वत:हून निर्णय घेणार नाही. हा निर्णय अमेरिकेच्या निर्णयावर अवलंबून असेल. कारण हा करार या दोन्ही देशांनी केलेला आहे, असेही प्रतिपादन त्यांनी केले. या करारानुसार अमेरिका आणि रशिया या दोन्ही देशांकडे असणारी अण्वस्त्रांची संख्या प्रत्येकी 1 हजार 550 पर्यंत, तर अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्रे आणि विमाने यांची संख्या 700 पर्यंत मर्यादित करण्यात आली आहे. त्यामुळे हा करार महत्वाचा आहे.









