पुन्हा एक वर्ष काम करण्याची दिली संधी : संरक्षण मंत्रालयाचा निर्णय
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डमधील नामनिर्देशित सदस्यांना एक वर्षाचा वाढीव कालावधी देण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी संरक्षण मंत्रालयाने देशभरातील सर्व कॅन्टोन्मेंट बोर्डमधील प्रशासकांचा कालावधी एक वर्षाने वाढविला आहे. बेळगावचे सुधीर तुपेकर यांना अजून एक वर्ष सदस्य म्हणून कामकाज करता येणार आहे.
2021 मध्ये कॅन्टोन्मेंटच्या जुन्या कार्यकारिणीचा कार्यकाळ संपला. त्यानंतर संरक्षण मंत्रालयाने निवडणुका घेण्यास परवानगी दिली नाही. कॅन्टोन्मेंट बोर्डचे जवळच्या महानगरपालिकांमध्ये हस्तांतरण होणार असल्याने निवडणुका घेण्याचे थांबविण्यात आले. त्यानंतर सहा ते सात महिने कॅन्टोन्मेंटच्या सीईओंनीच सर्व कारभार पाहिला. परंतु नागरिकांचा एखादा तरी प्रतिनिधी कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये असावा, या उद्देशाने नोव्हेंबर 2021 मध्ये नामनिर्देशित सदस्यांची निवड करण्यात आली. बेळगावमध्ये नोव्हेंबर 2021 पासून सुधीर तुपेकर नामनिर्देशित सदस्य म्हणून काम करीत आहेत. फेब्रुवारी 2025 मध्ये त्यांचा कार्यकाळ संपणार होता. परंतु त्यापूर्वीच म्हणजे डिसेंबर 2024 अखेरीला संरक्षण मंत्रालयाने अधिसूचना काढून प्रशासकांचा कालावधी एक वर्षासाठी वाढविला आहे. त्यामुळे पुढील वर्षभर नामनिर्देशित सदस्यांवर कॅन्टोन्मेंट बोर्ड चालवावा लागणार आहे.
निवडणुका घेण्याकडे कॅन्टोन्मेंटचे दुर्लक्ष
कॅन्टोन्मेंट बोर्डच्या निवडून आलेल्या सदस्यांचा कालावधी संपून चार वर्षे उलटली तरी अद्याप निवडणुका घेण्यात आल्या नाहीत. हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू असल्याने निवडणुका लांबणीवर टाकण्यात आल्याचे कारण देण्यात येत आहे. परंतु हस्तांतरणाची प्रक्रिया अत्यंत धिम्यागतीने सुरू आहे. अद्याप वर्षभर तरी हस्तांतरण प्रक्रियेला लागणार असल्याने तोपर्यंत नामनिर्देशित सदस्यांनाच कॅन्टोन्मेंटचा कार्यभार स्वीकारावा लागणार आहे.









