डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा सल्ला दिल्याचा दावा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आम आदमी पक्षाचे नेते सत्येंद्र जैन यांचा जामीन कालावधी सर्वोच्च न्यायालयाने 24 जुलैपर्यंत वाढविला आहे. 3 रुग्णालयांनी जैन यांना शस्त्रक्रियेचा सल्ला दिला असल्याचा युक्तिवाद त्यांच्या वतीने वकील ए.एम. सिंघवी यांनी न्यायाधीश ए.एस. बोपन्ना आणि एम.एम. सुंदरेश यांच्या खंडपीठासमोर सोमवारी केला.
जैन यांच्या वैद्यकीय अहवालांचा एक संच 8 जुलै रोजीच मिळाला असल्याचे सिंघवी यांनी सुनावणीदरम्यान म्हटले. तर ईडीचे सहाय्यक सॉलिसिटर जनरल राजू यांनी या अहवालाबद्दल संशय व्यक्त केला. यामुळे खंडपीठाने जैन यांच्या वकिलांना तिन्ही रुग्णालयांचा अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे.
यापूर्वी 26 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने वैद्यकीय स्थितीच्या आधारावर जैन यांना 6 आठवड्यांचा जामीन मंजूर केला होता. जामिनाचा हा कालावधी 11 जुलै रोजी संपुष्टात येणार होता. जैन हे जामीन मंजूर होण्यापूर्वी तिहार तुरुंगात 360 दिवस कैद होते. 25 मे रोजी सकाळी आप नेते जैन हे तिहार तुरुंगातील स्वच्छतागृहात पाय घसरून पडले होते. त्यांना दीनदयाळ उपाध्याय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर प्रकृती बिघडल्याने त्यांना अन्य रुग्णालयात हलविण्यात आले होते. जैन यांच्या विरोधात ईडीकडून मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी चौकशी सुरू आहे.









