पणजी : ई-लिलावाच्या माध्यमातून विक्री करण्यात आलेल्या खनिजमालाला ग्राहकांचा प्रतिसाद मिळाला खरा, परंतु एकही बोलीदार/व्यापारी/निर्यातदाराने अद्याप तो उचललेलाच नसल्यामुळे ठेवल्या ठिकाणी तसाच पडून आहे. यासंबंधी आता खाण खात्याने आदेश जारी करून संबंधितांना सदर माल त्वरित उचलण्यास सांगितले आहे. राज्याच्या विविध खाणींवर उत्खनन करण्यात आलेला खनिजमाल मोठ्या प्रमाणात पडून असून त्यातील काही खाणींवरील माल विकण्यासाठी नुकताच ई-लिलाव करण्यात आला होता. या लिलावास खरेदीदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.
माल उचलण्यास 31 मार्चची होती मुदत
लिलावातील अटीनुसार दि. 31 मार्च 2023 पर्यंत सदर माल उचलणे क्रमप्राप्त होते. परंतु नंतर उपस्थित झालेली विविध कारणे आणि अडचणींमुळे अनेकांनी तो माल अद्याप उचललेलाच नाही. अशा सर्व बोलीदारांना खाण खात्याने आदेश जारी करून सदर माल उचलण्यास सांगितले आहे. दरम्यान, माल उचलण्यासाठी अंतिम तिथी 31 मार्चपर्यंत असली तरी मध्यंतरीच्या काळात अनेक बोलिदारांकडून खात्यासमोर त्यांच्या अडचणी, समस्या मांडण्यात आल्या होत्या. त्यात त्यांनी आपली असहाय्यता प्रदर्शित करताना माल उचलण्याची वेळ मर्यादा वाढवून देण्याची विनंती केली होती. सदर विनंतीचा विचार करून सरकारने आता येत्या दि. 31 मे पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भात खाण संचालकांनी जारी केलेला आदेश ’भूमिजा’ पोर्टलवर नोंदणीकृत ई-मेल आयडीनुसार सर्व व्यापारी/निर्यातदारांना पाठविला आहे. त्याशिवाय खात्याच्या संकेतस्थळावरही सदर आदेश अपलोड करण्यात आला आहे.









