‘माय आधार’ पोर्टलवर पुढील सहा महिने सुविधा उपलब्ध
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची मुदत पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. सुधारित निर्णयानुसार ही मुदत 6 महिन्यांसाठी वाढवण्यात आली आहे. म्हणजेच लोक 14 जून 2025 पर्यंत आपले आधारकार्ड मोफत अपडेट करू शकतात. ही मोफत सेवा केवळ ‘माय आधार’ पोर्टलवर उपलब्ध असेल. आधार केंद्रांवर ऑफलाईन अपडेटसाठी फी भरावी लागेल. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने (युआयडीएआय) आधार तपशील मोफत अपडेट करण्याची तारीख वाढवल्याची घोषणा शनिवारी आपल्या ट्विटर हँडलद्वारे केली. ‘युआयडीएआय’ने लाखो आधार क्रमांक धारकांना लाभ देण्यासाठी मोफत ऑनलाईन दस्तऐवज अपलोड करण्याची सुविधा 14 जून 2025 पर्यंत वाढवली आहे. यापूर्वी ही सुविधा 14 डिसेंबर 2024 पर्यंत निर्धारित होती. आधार मोफत अपडेट करण्यासाठी लोक ‘माय आधार’ पोर्टलची मदत घेऊ शकतात.









