पुणे / प्रतिनिधी :
तंत्रशिक्षण संचालनालयाकडून सुरू असलेल्या तंत्रनिकेतनातील पदविका अभ्यासक्रम प्रवेश ऑनलाइन अर्जांसाठी 15 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच संचालनालयाकडून तीन फेऱ्यांचे सुधारित वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे.
प्रवेश प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी 7 जुलैची मुदत देण्यात आली होती. सुधारित वेळापत्रकानुसार 15 जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज भरून कागदपत्र पडताळणी आणि अर्ज निश्चिती करता येईल. तात्पुरती गुणवत्ता यादी 17 जुलैला जाहीर करण्यात येईल. 18 आणि 19 जुलैला यादीवर आक्षेप, हरकती नोंदवता येतील. 21 जुलैला अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल. केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेत 23 ते 26 जुलैदरम्यान विद्यार्थ्यांना तंत्रनिकेतनांचे पसंतीक्रम भरता येतील. 28 जुलैला तात्पुरते जागा वाटप करण्यात येईल. 29 जुलै ते 3 ऑगस्ट या कालावधीत विद्यार्थ्यांना जागेची स्वीकृती करावी लागेल. त्यानंतर 29 जुलै ते 4 ऑगस्ट या कालावधीत संस्थेत प्रवेश घ्यायचा आहे.
केंद्रीभूत प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीत 5 ऑगस्टला जागा जाहीर केल्या जातील. 6 ते 8 ऑगस्ट या कालावधीत विद्यार्थ्यांना पसंतीक्रम भरावा लागेल. 10 ऑगस्टला तात्पुरते जागा वाटप करण्यात येईल. 11 ते 16 ऑगस्ट या कालावधीत विद्यार्थ्यांना जागेची स्वीकृती करावी लागेल. तसेच 11 ते 17 ऑगस्ट या कालावधीत मिळालेल्या तंत्रनिकेतनात प्रवेश निश्चित करावा लागेल, अशी माहिती तंत्रशिक्षण संचालनालयाचे प्रभारी संचालक डॉ. विनोद मोहितकर यांनी दिली आहे.








